

Air Travel Gets Costlier
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. याचा थेट परिणाम आता विमान प्रवासावर होणार असून, सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख विमान कंपनी 'एअर इंडिया'ने इंधन अधिभारात (Fuel Surcharge) टप्प्याटप्प्याने वाढ करण्याची घोषणा आज (दि. ११) केली. यामुळे विमान प्रवास महागणार आहे.
विमान कंपनीने या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला असला तरी, विमान सेवा सुरू ठेवण्यासाठी ही वाढ 'अपरिहार्य' असल्याचे म्हटले आहे. नवीन दरवाढ तीन टप्प्यांत लागू केली जाईल. "अधिभार वाढवला नाही, तर विमान संचालनाचा खर्च निघणे कठीण होईल आणि काही उड्डाणे रद्द करावी लागतील," असे एअर इंडियाने स्पष्ट केले.
असे असतील नवीन दर
मध्य पूर्व देश: प्रति तिकीट १० डॉलर्स अधिभार.
आफ्रिका: ३० ते ९० डॉलर्सपर्यंत वाढ.
दक्षिण-पूर्व आशिया: २० डॉलर्सची वाढ (एकूण अधिभार ६० डॉलर्सवर).
मार्च २०२६ च्या सुरुवातीपासून विमान इंधनाच्या (ATF) किमतीत मोठी वाढ झाली आहे. विमान संचालनाच्या एकूण खर्चापैकी ४० टक्के खर्च इंधनावर होतो. दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये इंधनावरील उच्च अबकारी शुल्क आणि 'व्हॅट'मुळे विमान कंपन्यांच्या अर्थकारणावर मोठा ताण येत आहे. भारत आपल्या गरजेच्या बहुतांश कच्च्या तेलासाठी आयातीवर अवलंबून असल्याने जागतिक घडामोडींचा फटका भारतीय विमान कंपन्यांना बसत आहे.
इराण आणि अमेरिकेतील संघर्षामुळे केवळ तेलाचेच नव्हे, तर नैसर्गिक वायूचे दरही वाढले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' हा भाग युद्धक्षेत्र बनल्याने ७५० हून अधिक मालवाहू जहाजे बंदरांवर अडकून पडली आहेत. भारताच्या नैसर्गिक वायूच्या एकूण गरजेपैकी ५० टक्के आयात केली जाते, ज्यातील २० टक्के वाटा एकट्या कतारचा आहे.
एअर इंडियाने नमूद केले की, परिस्थितीचा आढावा घेऊन या दरांमध्ये वेळोवेळी बदल केले जातील. मात्र, एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या 'एअर इंडिया एक्सप्रेस'ने तूर्तास असा कोणताही अधिभार लागू न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.