बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणातील आरोपी, निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना आज भोपाळ न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.  pudhari
राष्ट्रीय

Twisha Sharma Case| कोर्टात राडा; ट्विशाच्या सासू, माजी न्यायाधीश गिरीबाला -वकिलांमधील आरोप-प्रत्यारोपांनी हायहोल्टेज ड्रामा

Twisha Sharma Case : न्यायालयाने दोन्ही आरोपींना सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुढारी वृत्तसेवा

Twisha Sharma Case

भोपाळ : बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणातील आरोपी, निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंग आणि त्यांचा मुलगा समर्थ सिंग यांना भोपाळ न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज (दि. २ जून) कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान प्रचंड गदारोळ, जोरदार खडाजंगी आणि गंभीर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या कोर्टरूममध्ये गिरीबाला सिंग यांनी स्वतःची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडली.

दोन्‍ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांनी गिरीबाला सिंग आणि त्यांच्या मुलावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यांना भोपाळच्या मुख्य न्यायिक दंडाधिकारी (CJM) न्यायालयात हजर करण्यात आले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांची पोलीस कोठडी वाढवून न मागितल्याने, न्यायालयाने दोन्ही आरोपींना १६ जूनपर्यंत भोपाळ सेंट्रल जेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. प्रकरणाचे संवेदनशील स्वरूप आणि सुरक्षेची कारणे लक्षात घेता त्यांना इतर कैद्यांपासून वेगळे ठेवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ट्विशाच्या सासू, माजी न्यायाधीश गिरीबाला यांचा कोर्टात संताप

सुनावणीदरम्यान कोर्टात एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. ६३ वर्षीय माजी महिला न्यायाधीश गिरीबाला सिंग यांनी स्वतः उभे राहून आपल्या केसचा युक्तिवाद सुरू केला. न्यायालयात उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्या अत्यंत संतप्त दिसत होत्या आणि वारंवार त्यांचा आवाज चढत होता. त्यांनी कोर्टात आरोपांची सरबत्ती केली. ट्विशा शर्माचे वकील अनुराग श्रीवास्तव यांनी जबलपूर हायकोर्टाच्या आवारात आपल्या मुलाला मारहाण केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. गिरीबाला सिंग यांच्या या आरोपाला वकील श्रीवास्तव यांनी तातडीने आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले. "जर अशी कोणतीही घटना खरोखरच घडली असेल, तर सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे. कोर्टाच्या संपूर्ण आवारात कॅमेरे आहेत, त्यातून सत्य समोर येईल," असे श्रीवास्तव यांनी सुनावले.

...आणि हाणामारीची वेळ आली

यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वकील श्रीवास्तव यांनी कोर्टासमोर आणखी एक स्फोटक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, "पोलीस अटक टाळण्यासाठी फरार असलेला आणि ज्याच्यावर ३०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, तो समर्थ सिंग जबलपूरच्या मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये कसा काय लपला? एका फरार गुन्हेगाराला तिथे आश्रय कसा मिळाला? या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे." यावर समर्थ सिंग यांच्या वकिलांनी त्यांचा बचाव करताना सांगितले की, "एखाद्या नागरिकाच्या जीवाला धोका असेल, तर स्वतःच्या सुरक्षेसाठी आश्रय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे."

कोर्टात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

कोर्टातील आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण कमालीचे तापले होते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मते, दोन्ही बाजूंचे वकील एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने एका क्षणी तिथे थेट हाणामारी होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

'मीडिया ट्रायल'वर आक्षेप

सुनावणीदरम्यान गिरीबाला सिंग यांनी या प्रकरणाच्या 'मीडिया ट्रायल'वर (प्रसारमाध्यमांद्वारे केल्या जाणाऱ्या चौकशीवर) तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. "आम्ही जिथे जातो तिथे media आमचा पाठलाग करतो. हे थांबले पाहिजे, आमच्या जीवाला धोका आहे," असे त्यांनी कोर्टाला सांगितले.

ट्विशा शर्माच्या मृत्यूनंतरचे व्हिडिओ फुटेज कोणी लीक केले?

गुन्ह्याच्या ठिकाणाची (क्राईम सीन) जी पुनर्रचना (Reconstruction) करण्यात आली, त्या पद्धतीवरही गिरीबाला सिंग यांनी आक्षेप घेतला. तपास अधिकाऱ्यांनी आपल्याला थेट घरापर्यंत गाडीत न नेता, घरापासून काही अंतरावरच का उतरवले? असा सवाल त्यांनी केला. घटनेनंतर सोशल मीडियावर आणि सार्वजनिक ठिकाणी व्हायरल झालेल्या वादग्रस्त सीसीटीव्ही फुटेजपासूनही या निवृत्त न्यायाधीशांनी स्वतःला दूर ठेवले. ट्विशा शर्माच्या मृत्यूनंतरचे ते व्हिडिओ फुटेज कोणी लीक केले, याबद्दल मला काहीही माहिती नाही, असे त्या म्हणाल्या.

सीबीआयने मांडली अत्यंत संयमाने बाजू

दोन्ही बाजूंनी कोर्टात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना सीबीआयने (CBI) मात्र संयम पाळला. आपण केवळ न्यायिक कोठडीची मागणी करत असून, भविष्यात गरज पडल्यास पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार राखून ठेवत असल्याचे सीबीआयने कोर्टाला सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT