

Tvisha Sharma death case
मध्य प्रदेशमधील बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाचा तपास आता वेगावला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी निवृत्त जिल्हा न्यायाधीश गिरिबाला सिंग आणि त्यांचा वकील मुलगा समर्थ सिंग यांना विशेष न्यायालयात हजर केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
सीबीआयचे पथक शुक्रवारी सकाळी आरोपींना घेऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शोभना भाल्वे यांच्या न्यायालयात पोहोचले. तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या पैलूंवर अद्याप चौकशी करणे आणि तांत्रिक पुरावे गोळा करणे बाकी आहे, ज्यासाठी कोठडी मिळणे गरजेचे आहे. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करत दोन्ही आरोपींची २ जूनपर्यंत सीबीआय कोठडी मंजूर केली आहे.ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंग आधीच सीबीआयच्या कोठडीत होता. शुक्रवारी त्याची आधीची कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी चौकशी दरम्यान सीबीआय दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून प्रश्नोत्तर करणार आहे. समर्थ सिंग फरार असतानाचे त्याचे लोकेशन, त्याचे संपर्क आणि त्याला मदत करणाऱ्यांविषयी देखील तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहे.
रिपोर्टनुसार, या प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा देत सीबीआय ‘टनल व्ह्यू इन्व्हेस्टिगेशन’ (Tunnel View Investigation) तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. ट्विशा शर्माच्या शेवटच्या काही तासांचे व्हर्च्युअल रीक्रिएशन (आभासी पुनर्रचना) यंत्रणेकडून तयार केले जात आहे, जेणेकरून घटनेच्या आधीच्या आणि नंतरच्या प्रत्येक हालचालीची मिनिट-बाय-मिनिट माहिती समजून घेता येईल. या तंत्रज्ञानामुळे प्रकरणातील अनेक अनुत्तरीत दुवे जोडण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.