Tripura DGP Anurag Dhankar File Photo
राष्ट्रीय

Tripura DGP Anurag Dhankar : त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धनकरांचा कार्यालयातच आढळला मृतदेह; जीवन संपविल्‍याचा संशय

मृत्यूमागील कारणाचा शोध घेण्‍यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

Tripura DGP Anurag Dhankar : त्रिपुराचे पोलीस महासंचालक (DGP) अनुराग धनकर यांचा मृतदेह आज (दि २० जुलै) आगरतळा येथील पोलीस मुख्यालयातील त्यांच्याच कक्षात संशयास्पद स्थितीत आढळला. त्यांनी जीवन संपविले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनकर यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि परिस्थिती शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. या प्रकरणातील पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.

मुख्‍यमंत्री सहा यांनी घेतली रुग्‍णालयात धाव

रिपोर्ट्सनुसार, धनकर हे पोलीस मुख्यालयातील (PHQ) त्यांच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्यांना तात्काळ आगरतळा येथील जी. बी. पंत रुग्णालयात नेण्यात आले, जेथे वरिष्ठ डॉक्टर डॉ. प्रदीप भौमिक यांनी दुपारी १२:४८ वाजता त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री माणिक सहा यांच्यासह मुख्य सचिव जे. के. सिन्हा आणि इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

शवविच्छेदन अहवालानंतरच होणार मृत्यूचे कारण स्पष्ट

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यालयात धाव घेत संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानंतरच (Post-Mortem) मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे माध्यमांनी सांगितले आहे. राज्याच्या सर्वोच्च पोलीस प्रमुखांच्या अशा अचानक झालेल्या निधनाने त्रिपुराच्या प्रशासकीय आणि कायदा व सुव्यवस्था वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनीही रुग्णालयात गर्दी केली होती.

कोण होते अनुराग धनकर?

त्रिपुरा कॅडरचे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले अनुराग धनकर यांनी मे २०२५ मध्ये राज्य सरकारकडून नियुक्ती झाल्यानंतर पोलीस महासंचालक पदाची सूत्रे हाती घेतली होती. डीजीपीपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी ते त्रिपुराचे डीजीपी (इंटेलिजन्स - गुप्तचर विभाग) म्हणून कार्यरत होते.

प्रदीर्घ कारकीर्दीत धनकर यांनी बजावली होती विविध विभागात सेवा

तीन दशकांपेक्षा जास्त काळ राहिलेल्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत धनकर यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI), सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) आणि कोसोव्होमधील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शांतता मोहिमेत महत्त्वपूर्ण सेवा बजावली होती.

नीरव मोदी प्रकरणाचा तपासाचे केले होते नेतृत्त्‍व

सीबीआयमध्ये (CBI) कार्यरत असताना, त्यांनी फरार हिरे व्यावसायिक नीरव मोदीचा समावेश असलेल्या पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते. त्यांनी सीबीआयमध्ये पोलीस अधीक्षक (SP), उपमहानिरीक्षक (DIG), संयुक्त संचालक (Joint Director) आणि अतिरिक्त संचालक (Additional Director) अशा अनेक वरिष्ठ पदांवर काम केले होते.

शीख दंगल चौकशीच्‍या एसआयटीचे अध्‍यक्षपदही भूषविले होते

याव्यतिरिक्त, धनकर यांनी सीआयएसएफ (CISF) मध्ये पोलीस महानिरीक्षक (कार्मिक) म्हणून काम पाहिले होते, तसेच गृह मंत्रालयांतर्गत १९८४ च्या शीख दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) अध्यक्षपदही भूषवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT