

Sonam Wangchuk hunger strike : "प्रत्येक जीव मौल्यवान आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी आणि भावाला त्यांना २४ तास भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. याबद्दल अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) आणि डॉक्टरांनी केलेल्या निवेदनाचीही आम्ही दखल घेतली आहे.वांगचुक यांच्या कुटुंबीयांना स्वतंत्र खोली देण्यात आली असून, ते त्यांच्यासोबत वेळ घालवू शकत आहेत, त्यामुळे या टप्प्यावर कोणताही अंतरिम आदेश पारित करण्याची आवश्यकता नाही. सोनम वांगचूक यांच्या वैद्यकीय स्थितीबाबतचा अंतिम निर्णय वैद्यकीय पथकाद्वारे घेतला जाईल, असे स्पष्ट करत वांगचुक यांना सरकारी सफदरजंग रुग्णालयातून खाजगी मेदांता रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज आज (दि.१९) दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यांना हलवताना कोणताही बळाचा वापर करण्यात आला नव्हता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणावर बसलेले लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जबरदस्तीने केलेल्या या कारवाईविरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. वांगचुक यांच्या पत्नीच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली, तर सरकारने त्यांच्या रुग्णालयातील दाखल करण्याचे समर्थन केले आहे.
सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सोनम वांगचुक यांच्या प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशाचा संदर्भ दिला. सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, "१७ तारखेला आरएमएल (RML) रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वांगचुक यांची तपासणी केली होती. त्यानंतर १८ तारखेला पहाटेच्या सुमारास त्यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तिथे त्यांचे वैयक्तिक डॉक्टर किंवा वकील यांपैकी कोणालाही त्यांना भेटू दिले गेले नाही. रुग्णालयात त्यांना कोणती औषधे दिली जात आहेत, याची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही. त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले नाही किंवा त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्याचे काहीच कारण नाही, आम्ही त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला असून पुढील उपचारासाठी मेदान्ता (Vedanta) हॉस्पिटलशी आमचे बोलणे झाले आहे," असे सिब्बल यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
यावेळी उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाला धारेवर धरत विचारले की, "सोनम वांगचुक यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणती अपरिहार्य किंवा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती का, हे सांगण्याची गरज तुम्हाला वाटते का?" न्यायालयाच्या या प्रश्नावर सरकारची बाजू मांडणारे सहाय्यक सॉलिसिटर जनरल (ASG) यांनी सांगितले की, रुग्णालयाकडून नियमित मेडिकल बुलेटिन जारी केले जात असून सफदरजंग रुग्णालयाचे डॉक्टर स्वतः कोर्टात हजर आहेत.
सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल का केले, याचे समर्थन करताना सरकारी वकिलांनी सांगितले की, "वांगचुक यांची प्रकृती झपाट्याने खालावत होती. अशा दमट हवामानात सलग १८ दिवस उपवास केल्यामुळे शरीरात 'केटोसिस' नावाची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती सुरुवातीला सामान्य वैद्यकीय तपासणी किंवा मापदंडांमध्ये दिसून येत नाही, परंतु यामुळे अचानक शरीराला मोठा शॉक बसू शकतो. सरकारी वकिलांनी पुढे वैद्यकीय कारणांचा हवाला देत सांगितले की, "दीर्घकाळ उपोषण केल्यामुळे शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते, ज्यामुळे 'हायपोग्लायसेमिया' (Hypoglycemia - रक्तातील साखर अत्यंत कमी होणे) सारखी धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच त्यांच्या आरोग्याचा विचार करूनच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.