राम कोटी या विवाह सोहळा आता परंपरेत बदलला आहे.  
राष्ट्रीय

Tragic Love Story | एका न झालेल्या लग्नाची गोष्ट..! मृत मुलासाठी २३ वर्षांपासून आईवडिलांनी जपली 'लग्ना'ची अनोखी परंपरा

Tragic Love Story | तेलंगणाच्या महबुबाबाद जिल्ह्यातील गावात दुःखातून सुरू झालेला 'विवाह सोहळा' आता परंपरेत बदलला

पुढारी वृत्तसेवा

Tragic Love Story

हैदराबाद : दोघेही एकाच गावातील... प्रेमात पडले.... एकमेकांच्या सोबतीने जगण्याची स्वप्ने पाहिली... जन्मभर साथ निभावण्याच्या आणाभाकाही घेतल्‍या; पण नियतीला काही वेगळेच होते. त्यांच्या प्रेमाच्या आड कुटुंबाच्या विरोधाची भिंत उभी राहिली. तरुणीच्या कुटुंबीयांनी विवाहाला विरोध केला. खचलेल्या तरुणाने मृत्यूला कवटाळले आणि त्याच्या विरहाच्या वेदना सहन न झाल्याने अवघ्या काही दिवसांतच तरुणीनेही आपले जीवन संपवले. दोन जीव गेले, दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि एक प्रेम कहाणी अधुरी राहिली. २३ वर्षांनंतर या ह्‍दयद्रावक घटनेमुळे झालेली हृदयातील जखम तरुणाच्या आई-वडिलांच्या मनात ताजी आहे. त्यांनी मुलाची इच्छा आणि त्याच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी प्रेमी युगुलाचा विवाह सोहळ्याची अनोखी परंपरा गेली २३ वर्ष जपली आहे. सुरुवातीला दुःखातून सुरू झालेला हा प्रवास आता एका परंपरेत बदलला असून, यासाठी संपूर्ण गाव एकत्र येते.

काय घडलं होते?

तेलंगणाच्या महबुबाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या लालु आणि सुक्कम्मा यांचा मुलगा राम कोटी याने २००३ मध्ये जीवन संपवले होते. राम कोटीचे एका मुलीवर प्रेम होते, तिच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या मृत्यूच्या अवघ्या काही दिवसांनंतर, त्या मुलीनेही आपले जीवन संपवले. या दुहेरी घटनेमुळे दोन्ही कुटुंबे पूर्णपणे कोलमडून गेली होती.

स्वप्नातील दृष्टांत आणि मंदिराची स्थापना

तरुण मुलाचा मृत्‍यूचा धक्‍का राम कोटीच्या पालकांसाठी सहन करण्यापलीकडे होता. मात्र, आपल्या मुलाची आठवण पुसू देण्याऐवजी त्यांनी त्याला कायमचे जवळ ठेवण्याचा मार्ग त्‍यांनी निवडला. सुक्कम्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या निधनानंतर तो त्यांच्या स्वप्नात आला होता. स्वप्नात त्याने आपल्या पालकांना त्याचे एक मंदिर बांधून त्याचे लग्न लावून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर श्रद्धा ठेवून, या दांपत्याने आपल्या घरातच मुलाचे एक छोटे मंदिर उभारले. तिथे त्यांनी आपला मुलगा आणि त्याने प्रेम केलेल्या मुलीचे पुतळे शेजारी-शेजारी बसवले आहेत.

रामनवमीला पार पडतो 'विवाह सोहळा'

तेलंगणामध्ये श्रीराम नवमीचा उत्सव प्रभू श्रीराम आणि सीता माता यांच्या 'कल्याणम' (दिव्य विवाह) सोहळ्यासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हापासून, हे दांपत्य दरवर्षी श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर या दोघांचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा आयोजित करते. हा विधी अगदी खऱ्या लग्नाप्रमाणेच प्रार्थना, नैवेद्य आणि सर्व रीतिरिवाजांसह पार पाडला जातो.

दुःखातून सुरू झालेला 'विवाह सोहळा' आता परंपरेत बदलला

आता हे केवळ एका कुटुंबाचे वैयक्तिक दुःख उरले नसून, त्याला एका स्थानिक परंपरेचे स्वरूप आले आहे. दरवर्षी गावकरी, नातेवाईक आणि परिसरातील लोक या अनोख्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि प्रार्थनेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT