Tinder Romance Scam Pudhari
राष्ट्रीय

Tinder Romance Scam: टिंडरवर ओळख, प्रेमाचे नाटक आणि 52 लाखांचा गंडा! महिला न्यायाधीश ‘रोमान्स स्कॅम’च्या जाळ्यात

Tinder Romance Scam: टिंडरवर झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका व्यक्तीने महिला न्यायाधीशांची तब्बल 52 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

पुढारी वृत्तसेवा

Tinder Romance Scam: ऑनलाइन डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच हरियाणातील एका महिला न्यायाधीशांशी संबंधित धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

टिंडर या डेटिंग अॅपवर झालेल्या ओळखीचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यांची तब्बल 52 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावताना हे प्रकरण ‘ऑनलाइन रोमान्स स्कॅम’चे असल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदवले आहे.

ही घटना नोव्हेंबर 2025 मधील असल्याचे सांगितले जात आहे. पीडित महिला न्यायाधीशांची टिंडरवर एका व्यक्तीशी ओळख झाली. या व्यक्तीने स्वतःची ओळख एका गुप्त सरकारी विभागातील अधिकारी म्हणून करून दिली आणि ‘अभिमन्यू वशिष्ठ’ असे नाव सांगितले. कालांतराने दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, आरोपीने मोठ्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवत न्यायाधीशांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. विश्वास संपादन केल्यामुळे त्यांनी आरोपीशी संबंधित विविध बँक खात्यांमध्ये 52 लाख रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा मिळाला नाही. त्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक झाल्यानंतरही महिला न्यायाधीशांनी स्वतःच्या नावाने तक्रार दाखल केली नाही. त्याऐवजी त्यांच्या घरात काम करणाऱ्या मदतनीस महिलेच्या नावाने एफआयआर दाखल करण्यात आला. या तक्रारीत डेटिंग अॅपद्वारे फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

मात्र, आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने बँक व्यवहारांची छाननी केली असता बहुतांश संशयास्पद आर्थिक व्यवहार हे न्यायाधीशांच्या खात्यांतून झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ प्रताप सिंह लालेर यांनी निरीक्षण नोंदवताना म्हटले की, दाखल करण्यात आलेली तक्रार आणि प्रत्यक्ष तक्रारदार यांच्यात विसंगती आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या न्यायिक अधिकाऱ्याने स्वतः पुढे येण्याऐवजी दुसऱ्याच्या नावाचा आधार घेणे ही गंभीर बाब असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, रोमान्स स्कॅमचा बळी ठरल्यामुळे वैयक्तिक लाज किंवा संकोच वाटणे स्वाभाविक असू शकते. मात्र, त्याच्या आधारावर तपास यंत्रणांपासून महत्त्वाचे पुरावे किंवा तथ्ये लपवणे योग्य ठरू शकत नाही.

दरम्यान, न्यायालयाने तपास प्रक्रियेबाबतही चिंता व्यक्त केली आहे. प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. टिंडरवरील संभाषण, संपूर्ण व्हॉट्सअॅप चॅट, तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासात जमा करण्यात आले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने पीडित महिला न्यायाधीशांना स्वतः पुढे येऊन संपूर्ण व्हॉट्सअॅप चॅट हिस्ट्री, टिंडरवरील संवाद आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपास अधिकाऱ्यांसमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दुसरीकडे, आरोपीवरही न्यायालयाने ताशेरे ओढले. आरोपीने केवळ न्यायाधीशांनी पाठवलेले मेसेज सादर केले असून स्वतःचे मेसेज लपवून ठेवले आहेत. तसेच त्याने स्वतःच्या मोबाईल फोन तपास यंत्रणांना देण्यास नकार दिल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

या प्रकरणामुळे ऑनलाइन डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या ‘हनी ट्रॅप’ आणि ‘रोमान्स स्कॅम’च्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT