राष्ट्रीय

Top 100 Food : ‘वडापाव’ची चव जगात 5 व्या स्थानावर..!, भारतीय खाद्यपदार्थ जगभरात भारी; ६ शहरांनी मिळवले 'टॉप १००' मध्ये स्थान

मुंबईतील 'पावभाजी' आणि 'भेळपुरी'च्या देसी चवीनेही जागतिक मंच गाजवला आहे.

रणजित गायकवाड

मुंबई : 'मायानगरी' मुंबईच्या चविष्ट पदार्थांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे! जगभरातील खाद्यपदार्थांची मानांकन करणारी सर्वात मोठी संस्था 'टेस्ट ॲटलस'ने नुकतीच सन २०२५-२०२६ ची 'जगातील १०० सर्वोत्तम फूड सिटीज'ची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईने सलग दुसऱ्यांदा जगात ५ वे स्थान पटकावले आहे. दिल्ली, लखनऊ आणि हैदराबादसारख्या दिग्गज खाद्य शहरांना मागे टाकत, मुंबईतील 'वडापाव', 'पावभाजी' आणि 'भेळपुरी'च्या देसी चवीने जागतिक मंच गाजवला आहे.

मुंबईचा जलवा कायम: स्ट्रीट फूडची 'ग्लोबल' ओळख

मुंबई हे केवळ बॉलिवूड किंवा आर्थिक राजधानी नाही, तर ते उत्कृष्ट स्ट्रीट फूडचे माहेरघर आहे. या जागतिक मानांकनात, इटलीतील नेपल्सने पहिले स्थान मिळवले असले तरी, मुंबईचा टॉप ५ मध्ये समावेश होणे ही भारतीय खाद्यसंस्कृतीसाठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

या मानांकनासाठी जगभरातील १६,००० हून अधिक पदार्थांवर सुमारे ५.९ लाख लोकांचे रेटिंग विचारात घेण्यात आले. या प्रचंड सर्वेक्षणातून मुंबईतील गल्ली-बोळात मिळणारा चटपटीत आणि कुरकुरीत 'देसी स्वाद' आता जागतिक स्तरावर राज करत असल्याचे सिद्ध झाले आहे.

'टॉप १००' मध्ये ६ भारतीय शहरांचा समावेश

मुंबईसह, या यादीत भारताच्या आणखी पाच शहरांनी मानाचे स्थान मिळवले आहे:

  • मुंबई : ५ वे स्थान

  • अमृतसर : ४८ वे स्थान

  • नवी दिल्ली : ५३ वे स्थान

  • हैदराबाद : ५४ वे स्थान

  • कोलकाता : ७३ वे स्थान

  • चेन्नई : ९३ वे स्थान

'टॉप १००' डिशेसमध्ये अमृतसरी कुलचा ठरला 'बाजीगर'

शहरांच्या जोडीला, 'टेस्ट ॲटलस'ने जगातील '१०० सर्वोत्तम व्यंजन'ची यादीही प्रसिद्ध केली आहे. यात भारतीय पदार्थांनी आपला मसाल्यांचा तडका यशस्वीपणे दाखवला आहे.

  • अमृतसरी कुलचा : १७ वे स्थान : तूप आणि मसाल्यांनी परिपूर्ण, कुरकुरीत आणि चटपटीत अनुभव.

  • मुर्ग मखनी (बटर चिकन) : ६६ वे स्थान : जाड, मलईदार आणि चविष्ट ग्रेव्ही, जगभरातील खवय्यांची पहिली पसंती.

  • हैदराबादी बिर्याणी : ७२ वे स्थान : तांदळाच्या पदार्थांमध्ये १० वे स्थान. दमवर शिजवलेली खास बिर्याणी.

  • शाही पनीर : ८५ वे स्थान : भारतीय मसाल्यांचा आणि पनीरचा शाही संगम.

भारतीय प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचीही वेगळी ओळख

केवळ शहरे आणि पदार्थांपुरतेच नाही, तर भारताच्या प्रादेशिक खाद्यसंस्कृतीनेही आपली छाप पाडली आहे. 'जगातील १०० सर्वोत्तम खाद्य प्रदेशां'च्या यादीत चार भारतीय प्रदेशांचा समावेश आहे.

  • दक्षिण भारत : ४० वे स्थान (मसाला डोसा, हैदराबादी बिर्याणी, नेथिली फ्राय)

  • पश्चिम बंगाल : ७३ वे स्थान

  • महाराष्ट्र : ७६ वे स्थान

  • केरळ : ९७ वे स्थान

जागतिक खाद्यसंस्कृतीत भारत १३ व्या स्थानावर

एकंदरीत 'भारतीय खाद्यसंस्कृती'च्या मानांकनात भारताने यावर्षी १३ वे स्थान मिळवले आहे. मागील वर्षीच्या १२ व्या स्थानावरून किंचित घसरण झाली असली तरी, भारताने पेरू, पोर्तुगाल आणि स्पेनसारख्या देशांना मागे टाकले आहे. 'टेस्ट ॲटलस'ने बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा, तंदूरी चिकन आणि कोरमा हे भारतीय पदार्थ 'नक्की चाखून पाहण्यासारखे' म्हणून खास नमूद केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT