

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शुक्रवारपासून खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव ३ दिवस चालणार असून सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा, हा या मागचा उद्देश आहे.
दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात या खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा आणि कलेचा संगम पाहायला मिळणार आहे. नवरसांनी पूर्ण अशा चवदार पदार्थांची रेलचेल दिल्लीकरांना या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
कोल्हापुरी तांबडा- पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन, मटण, नागपूर विभागातील सावजी चिकन, मटण रस्सा, तर्री पोहा आणि संत्रा मिठाई, पुणे भागातील मिसळ पाव, वडा पाव आणि पुरण पोळी, जळगावातील शेव भाजी, वांग्याचे भरीत आणि केळीशी संबंधित पदार्थ, मालवणातील मालवणी सीफूड, कोंबडी वडे आणि सोल कढी, छत्रपती संभाजीनगर मधील नान खलिया, डालिंबी उसळ आणि बिर्याणी यांचा समावेश असेल. सोबतच या खाद्य महोत्सवात सातारा, कोल्हापूर, जळगाव, पुणे अमरावती, रायगड या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत असलेले महिला स्वयंम सहायता समूह सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडील रुचकर पदार्थांचा देखील आस्वाद घेता येणार आहे.
दिल्लीतील खाद्य महोत्सवात खाद्यपदार्थांसह महाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा विशेष माहिती स्टॉल देखील असणार आहे. या स्टॉलद्वारे महाराष्ट्रातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येईल. पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वितरण करून महाराष्ट्राच्या पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्याचा मानस असल्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांनी सांगितले. या महोत्सवाच्या निमित्ताने दिल्लीकर नागरिकांनी महोत्सवातील खाद्यपदार्थांसह सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले.