Tamil Nadu cabinet expand: तमिळ नाडूमधील जोसेफ विजय सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत आहे. यात टीव्हीके पक्षाच्या २१ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे तर काँग्रेसमधील दोन आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस जवळपास ६० वर्षानंतर तमिळनाडूत सरकारमध्ये सामील होत आहे.
विजय यांनी १० मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यापूर्वी सत्ता स्थापनेसाठी मोठी राजकीय धावपळ विजय यांना करावी लागली होती अखेर VCK, CPI आणि IUML या पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला.
मात्र आज गुरूवारी मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी विजय यांच्या दोन सहकारी पक्षांना यात स्थान मिळालं नसल्यामुळं राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. याच व्हीसीके आणि आयुएमएल या पक्षांचा समावेश आहे. या दोन्ही पक्षांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता. यातील एकाही पक्षाला मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळालेलं नाही.
एनडीटीव्ही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही सहकारी पक्षांना कॅबिनेटमध्ये प्रत्येकी एक मंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र त्या पक्षांनी त्यांच्या पक्षातून कोण मंत्री होणार याची नावे दिलेली नसल्यामुळं सध्या त्यांचे नाव मंत्रीमंडळ विस्तारात नाहीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हीसीके आणि आयुएमएल यांचा मंत्रीमंडळात नंतर समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. विजय यांचे मंत्रीमंडळ हे ३५ जणांचे असू शकते. ( २३५ या हाऊस स्ट्रेंथच्या १५ टक्के) आतापर्यंत विजय यांच्या मंत्रीमंडळात ३२ जणांचा समावेश करण्यात आला आहे. अजून ३ जागा भरल्या जाऊ शकतात.
व्हीसीके आणि आयुएमएल हे दोन स्थानिक पक्ष हे एमके स्टॅलिन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेवेळी चांगलेच झुंजवले होते. विजय यांना शेवटच्या क्षणापर्यंत गॅसवर ठेवलं होतं. अखेर त्यांनी टीव्हीकेला अधिकृतरित्या पाठिंबा दिला. मात्र यावेळी त्यांनी हे आम्ही माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या आशीर्वादाने करत आहोत असं देखील सांगितलं होतं. राज्यपाल राजवट लागू नये म्हणून हे पाऊल उचललं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
आता देखील ते मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी हाच खेळ खेळत आहेत. टीव्हीकेचे वरिष्ठ मंत्री अधव अर्जुन यांनी सीव्हीके आणि आयुएमएल दोन्ही पक्ष मंत्रीमंडळात समाविष्ट केले जातील. दोन्ही पक्षांनी कोणत्या आमदारांना मंत्री करायचं आहे हे अजून सांगितलं नसल्यामुळं त्यांचा समावेश थांबला आहे असं सांगितलं.
दरम्यान, राजकीय जाणकारांच्या मते डीएमकेच्या जवळ असलेले हे दोन स्थानिक पक्ष सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. ते विजय यांचे सरकार कसे चालते हे पाहून विजय यांचे मंत्रीमंडळ जॉईन करतील असा अंदाज वर्तवला जात आहे. जर सरकार व्यवस्थीत चालत असेल तर डीएमकेसोबतची आघाडी तोडून ते पूर्णपणे टीव्हीकेसोबत जातील.
व्हीसीके पक्षाला उपमुख्यमंत्रीपद हवे आहे अशी देखील जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभेचे खासदार असलेले थुरूमावलवन यांना उपमुख्यमंत्रीपदामध्ये रस आहे. त्यामुळं व्हीसीके पक्ष अजूनही जोरदार वाटाघाट करत आहे अशी एक शक्यता देखील बोलून दाखवली जात आहे.