मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3D डिजिटल कॅरेक्टरचे विमोचन झाले तो प्रसंग आणि छोटा वारकरीचे 3D डिजिटल कॅरेक्टर  Pudhari
राष्ट्रीय

Ashadhi Wari 2026 | वारी नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा 'छोटा वारकरी': AI च्या माध्यमातून वारकरी परंपरा पोहोचवण्याचे प्रयत्न

संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ स्वप्नील मोरे यांनी 'छोटा वारकरी' ही संकल्पना विकसित केली

पुढारी वृत्तसेवा

Chhota Warkari

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख आहे. शतकानुशतके लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात. काळानुसार संवादाची माध्यमे बदलली, तंत्रज्ञान विकसित झाले आणि त्याचा परिणाम वारीवरही दिसू लागला. सोशल मीडियानंतर आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातूनही वारकरी परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नांमधील एक वेगळी आणि लक्षवेधी संकल्पना म्हणजे 'छोटा वारकरी'.

संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ स्वप्नील मोरे यांनी 'छोटा वारकरी' ही संकल्पना विकसित केली. यापूर्वी 'फेसबुक दिंडी'च्या माध्यमातून त्यांनी वारीचे डिजिटल दस्तावेजीकरण करत जगभरातील भाविकांना पालखी सोहळ्याशी जोडण्याचे काम केले. मात्र त्यांच्या मनात एक प्रश्न कायम होता की, लहान मुलांना वारकरी संप्रदाय, संतपरंपरा आणि वारीचे महत्त्व त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या आवडीच्या माध्यमातून कसे समजावून सांगायचे? याच प्रश्नातून 'छोटा वारकरी'चा जन्म झाला.

'छोटा वारकरी' हे AI-आधारित 3D डिजिटल पात्र आहे. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून वारीचा इतिहास, संतांचे विचार, अभंगांचे महत्त्व, वारकरी संप्रदायातील परंपरा, विठ्ठलभक्ती आणि वारीतील विविध विधी अतिशय सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडले जातात. आजची पिढी दृश्य माध्यमाशी अधिक जोडलेली असल्याने छोट्या आणि प्रभावी व्हिडिओंच्या माध्यमातून माहिती देण्याचा हा प्रयोग विशेष लक्षवेधी ठरला आहे.

या संकल्पनेमागे एक भावनिक पैलूही आहे. स्वप्नील मोरे यांच्या मुलीचे नाव 'वारी' असले, तरी तिलाच वारीची संकल्पना सहज समजावून सांगणे कठीण जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हाच घरापासून सुरुवात करून लहान मुलांसाठी वारकरी परंपरा समजावून सांगणारे एक डिजिटल पात्र तयार करण्याचा विचार त्यांनी प्रत्यक्षात आणला. त्यासाठी त्यांनी विविध लोकप्रिय अॅनिमेटेड व्यक्तिरेखांचा अभ्यास केला, संशोधन केले आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने 'छोटा वारकरी' साकारला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे विमोचन केले.

'छोटा वारकरी' या डिजिटल व्यक्तिरेखेच्या माध्यमातून 'राम कृष्ण हरी'चा गजर का केला जातो, 'ज्ञानोबा-तुकाराम'चा जयघोष कसा सुरू झाला, रिंगण म्हणजे काय, पायघड्यांचे महत्त्व काय, अशा अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरे दिली जातात. वारीमध्ये सहभागी असल्याप्रमाणे छोटा वारकरी विविध ठिकाणी फिरताना दिसतो आणि तेथील माहिती मुलांना सहज समजेल अशा शैलीत सांगतो. त्यामुळे ही व्यक्तिरेखा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहत नाही, तर संस्कार आणि ज्ञान देणारे प्रभावी माध्यम ठरते.

आगामी काळात षड्रिपू, तुकाराम महाराजांच्या अभंगांचे सार, वारकरी परंपरेची मुळाक्षरे आणि अशा अनेक विषयांवर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओ, शैक्षणिक उपक्रम आणि खेळ तयार करण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे वारकरी परंपरेचा परिचय मुलांना केवळ पुस्तकांतून नव्हे, तर आधुनिक डिजिटल माध्यमातूनही होणार आहे.

परंपरा जपण्यासाठी ती काळानुसार नव्या पद्धतीने मांडणे आवश्यक असते. 'छोटा वारकरी' हा त्याच विचाराचा आधुनिक आविष्कार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ तांत्रिक प्रयोग म्हणून नव्हे, तर सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठीही प्रभावीपणे करता येऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. बदलत्या काळात वारीचा संदेश आणि संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम 'छोटा वारकरी' करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT