Surya Grahan 2026
नवी दिल्ली : वर्ष २०२६ मधील पहिले सूर्यग्रहण मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ (फाल्गुन अमावस्या) रोजी लागणार आहे. भारतीय वेळेनुसार, हे ग्रहण दुपारी ३:२६ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ७:५७ वाजेपर्यंत असेल. तब्बल ४ तास ३० मिनिटे या खगोलीय घटनेचा प्रभाव जाणवेल. जगभरातील खगोलप्रेमींचे या दुर्मिळ घटनेकडे लक्ष लागले आहे.
वैज्ञानिक भाषेत याला वलयाकार सूर्यग्रहण असे म्हणतात. या काळात चंद्र पृथ्वीपासून दूर असल्याने तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. परिणामी, सूर्याचा मधला भाग काळवंडतो आणि कडेने एक तेजस्वी प्रकाशवर्तुळ दिसते. हे दृश्य एखाद्या सोन्याच्या अंगठीप्रमाणे किंवा 'आगच्या कड्या'सारखे (रिंग ऑफ फायर) दिसते.
खगोलप्रेमींसाठी महत्त्वाची बाब म्हणजे, हे ग्रहण दक्षिण गोलार्धातून जाणार असल्याने भारतातून दिसणार नाही. ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार पाळला जाणारा 'सूतक काळ' येथे लागू होणार नाही. भारतात कोणत्याही शुभ कार्यावर किंवा दैनंदिन दिनचर्येवर या ग्रहणामुळे निर्बंध नसतील.
या ग्रहणाचा सर्वात महत्त्वाचा आणि अद्भूत क्षण केवळ २ मिनिटे २० सेकंदांचा असेल. या काळात चंद्र सूर्याचा ९६ टक्के भाग व्यापेल. सर्यू ग्रहणाची सुरुवात दुपारी ३:२६ (भारतीय वेळ) होईल. परमोच्च स्थिती : संध्याकाळी ५:४२ वाजता असेल. संध्याकाळी ७:५७ वाजता संपेल.
हे सूर्यग्रहण प्रामुख्याने अँटार्क्टिका खंडात सर्वात स्पष्टपणे दिसेल. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका, टांझानिया, झांबिया, झिम्बाब्वे यांसारख्या आफ्रिकन देशांमध्ये आणि दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना व चिलीच्या काही भागांत हे ग्रहण अंशतः पाहता येईल.