

वॉशिंग्टन : पृथ्वीवरून अनेक लोक सूर्यग्रहणाचे दृश्य पाहत असतात. विशेषतः 'डायमंड रिंग'चे दृश्य तर अतिशय विलोभनीय असते. मात्र, मंगळावरून सूर्यग्रहणाचे दृश्य कसे दिसत असेल याची आपण कल्पनाही करत नाही. आता 'नासा'ने मंगळावर झालेल्या सूर्यग्रहणाला रेकॉर्ड केले आहे. 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळ ग्रहाच्या फोबोस नावाच्या चंद्राला सूर्यासमोरून जात असताना रेकॉर्ड केले आहे. हा चंद्र एखाद्या बटाट्यासारख्या आकाराचा आहे.
फेब—ुवारी 2021 मध्ये पर्सिव्हरन्स रोव्हरला मंगळावर पाठवण्यात आले होते. 2 एप्रिलला रोव्हरने 'नेक्स्ट जनरेशन मास्टकॅमे-झेड कॅमेर्याच्या सहाय्याने हे ग्रहण रेकॉर्ड केले. सॅन दियागोमध्ये मालिन स्पेस सायन्स सिस्टम्समध्ये 'मास्टकॅम-झेड कॅमेरा' संचालित करणार्या टीममधील सदस्य रेचल हावसन यांनी सांगितले की हे रेकॉर्डिंग चांगले होईल याची आम्हाला आशा होती; पण ते आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक चांगले ठरले! मंगळाच्या दोन चंद्रांपैकी फोबोस हा सर्वात मोठा चंद्र आहे. तो दिवसातून तीनवेळा मंगळाभोवती प्रदक्षिणा घालतो. मंगळाच्या पृष्ठभागाच्या अतिशय जवळ असलेला हा चंद्र आहे. त्यामुळे अनेकवेळा तो मंगळाच्या अनेक ठिकाणांहून दिसून येत नाही. पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळभूमीवर उतरल्याच्या 397 व्या दिवशी हे ग्रहण झाले जे 40 सेकंदांपेक्षा थोडे अधिक काळ चालले. हे पृथ्वीवर होणार्या सूर्यग्रहणाच्या तुलनेत अतिशय लहान आहे. पृथ्वीच्या चंद्रापेक्षा फोबोस 157 पटीने लहान आहे.