

वॉशिंग्टन : चंद्र आणि मंगळाचे तुकडे उल्कांच्या स्वरूपात पृथ्वीवर नेहमीच सापडतात; पण सूर्याच्या सर्वात जवळच्या आणि रहस्यमय अशा बुध ग्रहाचा एकही तुकडा आजपर्यंत आपल्या हाती लागला नव्हता. मात्र, आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या एका गटाने नुकत्याच केलेल्या अभ्यासात अशा दोन उल्का शोधून काढल्या आहेत, ज्या थेट बुध ग्रहावरून तुटून पृथ्वीवर आल्या असाव्यात, असा प्रबळ दावा करण्यात आला आहे. हा शोध खगोलशास्त्रासाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो.
पृथ्वीवर येणार्या बहुतेक उल्का मंगळ आणि गुरू यांच्यातील लघुग्रहांच्या पट्ट्यातून येतात. याशिवाय, चंद्र आणि मंगळावर लघुग्रह आदळल्याने उडालेले हजारो तुकडेही पृथ्वीवर पोहोचले आहेत. मग बुध ग्रहाच्या बाबतीत असे का घडले नाही? हा प्रश्न शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून सतावत होता. नव्या शोधामुळे या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. एका आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, या दोन उल्कांची रासायनिक रचना आणि त्यातील खनिजे ही नासाच्या ‘मेसेंजर’ यानाने बुधाच्या पृष्ठभागाबद्दल पाठवलेल्या माहितीशी मिळतीजुळती आहेत.
‘मेसेंजर’ मोहिमेनुसार, बुधाच्या पृष्ठभागावर खालील खनिजे आढळतात : सोडियम-समृद्ध प्लेजिओक्लेज, लोहाचे प्रमाण कमी असलेले पायरोक्सिन आणि ऑलिव्हिन, ओल्डहामाईटसारखी सल्फाईड खनिजे. नव्याने सापडलेल्या उल्कांमध्ये हीच वैशिष्ट्ये आढळून आल्याने शास्त्रज्ञांचा उत्साह वाढला आहे. बुध ग्रह सूर्याच्या इतका जवळ आहे की, त्यावर कोणतीही अंतराळ मोहीम पाठवून तिथून माती किंवा खडकांचे नमुने पृथ्वीवर आणणे तांत्रिकद़ृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि प्रचंड खर्चिक आहे.
अशा परिस्थितीत, जर बुधाचा एखादा तुकडा नैसर्गिकरित्या उल्केच्या रूपात पृथ्वीवर आला असेल, तर तो शास्त्रज्ञांसाठी एका अमूल्य खजिन्यापेक्षा कमी नाही. या तुकड्यांचा अभ्यास करून बुधाची निर्मिती कशी झाली, त्याची भूगर्भीय रचना कशी आहे आणि कोट्यवधी वर्षांमध्ये त्यात काय बदल झाले, याबद्दलची थेट माहिती मिळू शकते. याआधी ‘नॉर्थवेस्ट आफ्रिका 7325’ आणि ‘ऑब्राईट’ प्रकारच्या उल्का बुधावरून आल्या असाव्यात, असे दावे करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यातील खनिजांची रचना बुधाच्या पृष्ठभागाशी पूर्णपणे जुळत नसल्याने ते दावे सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे सध्याच्या शोधाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.