Surpanakha Dahan :
या वर्षी दसऱ्याला इंदौरमध्ये रावण दहन होणार नाही तर शूर्पणखा दहन होणार आहे. ऐकून तुम्ही देखील चमकलात ना... सहसा दसऱ्याला दहा तोंडी रावणाचं दहन केलं जातं मात्र यावेळी थोडा ट्विस्ट आहे. यावेळी रावणाची बहीणशूर्पणखाचं दहन होणार आहे. याला भारतात गेल्या काही वर्षात घडलेल्या काही घटनांचा संदर्भ आहे. या शूर्पणखा दहनाचे आयोजन इंदौरमधील पौरूष ही संघटना करणार आहे.
आता या संघटनेचं नाव ऐकूनच ही संघटना काय काम करते याची तुम्हाला कल्पना आली असेल. ही संघटना पत्नी पीडित पुरूष लोकांचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळंच त्यांनी यंदा दसऱ्याला इंदौरच्याच सोनम रघुवंशी आणि मेरठच्या मुस्कान या दोन महिलांच्या पुतळ्यांचे प्रातिनिधिक दहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार यंदा सोनम रघुवंशी ही केंद्रस्थानी असणार आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष अशोक दशोरा यांनी सांगितलं की आम्हाला याद्वारे पुरूषच वाईट नसतात हे दाखवून द्यायचं आहे.' ते पुढे म्हणाले, 'जर त्या काळात रावण हा वाईटाचं प्रतिक असेल तर आजच्या काळातील वेगवेगळ्या आधुनिक शूर्पणखा या विद्ध्वंसाचं प्रतिक आहेत.'
संघटनेनं शूर्पणखा दहनाचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सोनम रघुवंशी ही केंद्रस्थानी आहे. मे आणि जून महिन्यात इंदौरची ही सोनम प्रकाशझोतात होती. तिनं आपल्या पतीचा मेघालयमध्ये हनिमूनवर असताना खून केला होता. यासाठी तिनं मोठं प्लॅनिंग केलं होतं.
दरम्यान, संघटनेनं वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या ११ महिलांच्या चेहऱ्यांची निवड केली आहे. यात सायबर क्राईम, फ्रॉड, तस्करी आणि खून या गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या महिलांचा समावेश आहे.
सोनम सोबत, मेरठ प्रकरणातील मुस्कानचा देखील समावेश आहे. तिच्यावर पतीचा खून करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये ठेवल्याचा आरोप आहे.
दरम्यान, संघटनेनं सांगितलं आहे की या सर्व प्रतिकात्मक पुतळ्यांचे शहरातून मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर दसऱ्यादिवशी त्यांच महालक्ष्मी नगर मेला ग्राऊंड इथं सायंकाळी ६.३० ला दहन करण्यात येईल. पौरूष या संघटनेच्या या पोस्टरमुळं एका वेगळ्याच चर्चेला ऊत आला आहे. अनेकांच्या मते हे एक खूपच मोठं पाऊल आहे. दुसरीकडं अनेकांनी हा पारंपरेचा खेळखंडोबा केल्याचा प्रकार आहे अशी टीका केली आहे.