Surat Man Kills Dietitian Wife
गुजरातच्या सुरतमध्ये एका पतीच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह जुन्या घरामध्ये सिमेंटने भरलेल्या लाकडी पेटीत लपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी विशाल साळवी (वय ४०) याने पत्नीचा खून केल्यानंतर चार दिवसानंतर स्वतःच पोलिसांत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती.
आरोपी विशाल साळवी याने आपली ३९ वर्षीय पत्नी शिल्पा साळवी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होता. शिल्पा व्यवसायाने आहारतज्ज्ञ (Dietitian) होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याचे विशालने सांगितले. मात्र, तपासादरम्यान विशालच्या अल्पवयीन मुलाला घरात एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली. त्याने ती पोलिसांच्या हवाली केली.या चिठ्ठीत विशालने कबुलीवजा मजकूर लिहिला होता की, "माझ्याकडून एक मोठी चूक झाली असून शिल्पा आता जिवंत नाही." या चिठ्ठीमुळे पोलिसांच्या तपासाची दिशा पूर्णपणे बदलली.
चिठ्ठी मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयावरून सालाबतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जुन्या बंद घराची झडती घेतली. हे घर विशालच्या मालकीचे होते. घराचे कुलूप तोडले असता पोलिसांना उग्र वास आला. घरातील एका कोपऱ्यात ठेवलेल्या लाकडी पेटीतून हा वास येत होता. ती पेटी उघडली असता त्यात कच्च्या सिमेंटखाली गाडलेला शिल्पा यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.
प्राथमिक माहितीनुसार, या दाम्पत्यामध्ये गेल्या काही काळापासून घरगुती वाद सुरू होते. विशालला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यातूनच ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. ही हत्या बेपत्ता तक्रार नोंदवण्याच्या ४-५ दिवस आधीच करण्यात आली होती. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, " महिलाबेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर आम्ही तपास सुरू केला होता, पण त्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत आहे."
गुन्हा उघडकीस आल्यापासून आरोपी विशाल साळवी फरार आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत. विविध पोलीस पथके त्याला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.