Supriya Sule Criticism
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांना जोपर्यंत पकडले जात नाही, तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्ला चढवला. तसेच कारगिल युद्धानंतर ज्या पद्धतीने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक अहवाल तयार केला होता तशाच प्रकारचा अहवाल विद्यमान सरकारनेही पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात करावा आणि संसदेत सादर करावा, असे आवाहन सरकारला केले.
सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी आजवर झालेल्या विविध ऑपरेशन्स आणि युद्धांचे संदर्भ देत आजवरच्या पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले आणि भाजप खा. तेजस्वी सूर्या यांनी चुकीची माहिती सभागृहात मांडल्याबद्दल त्यांना चांगलेच फटकारले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत बोलताना सत्ताधारी पक्षांनी वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख केला. त्यामुळे त्यांचा नक्की उद्देश काय होता, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. देशावर जेव्हा २६/११ चा हल्ला झाला तेव्हाही हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. त्यावेळी कोणाचे सरकार होते, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही म्हणणार नाही की हे सरकारचे श्रेय आहे, हे पोलिसांचे श्रेय आहे, असेही त्या म्हणाल्या आणि कसाबला पकडण्यापासून फाशीपर्यंतचा प्रवास त्यांनी सभागृहात मांडला.
पुण्यातील जगदाळे कुटुंबाचा उल्लेख करत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या नातेवाईकांचा उल्लेख खा. सुळे यांनी केला. संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी आणि पत्नी प्रीती तसेच कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटूंबीय संगीता गनबोटे जेव्हा भेटतात तेव्हा हल्ल्याबद्दल मला प्रश्न विचारतात. आमच्या कुटूंबियांना मारले गेले. त्यांना न्याय कधी मिळेल, हल्लेखोर आरोपी कोण आहेत, ते तिथे आले कसे, गेले कसे, याबद्दल विचारतात. या हल्ल्यात आपले नातेवाईक गमावलेल्या सर्वांच्या या वेदना आहेत, असेही त्या म्हणाल्या. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांची काय चूक होती, ते सुट्टी घालवण्यासाठी गेले होते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकारने आसावरी जगदाळे यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. आजवर त्या संदर्भात काहीही झाले नाही. मध्यप्रदेश भाजप सरकार मधील मंत्री कर्नल सोफिया कुरेशींबद्दल चुकीचे वक्तव्य केले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या मुलीला ट्रोल केले गेले. हिमांशी नरवाल यांचे व्हिडिओ फिरवून ट्रोल करण्यात आले. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत, असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही ज्या ज्या देशांमध्ये गेलो त्या देशांमध्ये आम्हाला ४ लोकांबद्दल विचारले गेले. महात्मा गांधींच्या देशातून आलात, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींच्या देशातून आलात, तुम्ही पंतप्रधान मोदींच्या देशातून आलात, असे आम्हाला तिथले लोक म्हणायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली.
तेजस्वी सूर्या यांनी बोलताना देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधीही भारतीय सैन्याला प्रोत्साहन दिले नाही. यावेळी पहिल्यांदाच भारतीय सैन्याने अप्रतिम कामगिरी केली, असे वक्तव्य तेजस्वी सूर्या यांनी केले. त्यांच्या अशा वक्तव्याने देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याचा अपमान झाल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आजवर भारतीय सैन्याने वेगवेगळ्या ऑपरेशन्स मध्ये आणि युद्धामध्ये केलेल्या कारवाईचे यादीच वाचली आणि तेजस्वी सूर्या यांना कडक शब्दात सुनावले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाठवलेल्या विविध शिष्टमंडळांमध्ये विरोधकांचा समावेश केला, विरोधी पक्षांच्या लोकांनाही नेतृत्व करू दिले, ही खरी लोकशाही आहे. हल्यानंतर पहिल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी सरकार सोबत असल्याचे म्हटले. तेजस्वी सूर्य यांच्यासारखे लोक चुकीचा इतिहास सभागृहासमोर मांडतात आणि ते रेकॉर्डवर जाते, असेही त्या म्हणाल्या. यावेळी ऑपरेशन सिंदूरनंतर पाठवलेल्या शिष्टमंडळात पाठवण्यासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभारही मानले.