

नागपूर : शिक्षण हा विषय खूप गंभीर आहे. 'त्यांचे सरकार की आमचे सरकार' असा प्रश्न नाही. शिक्षणासंदर्भातला निर्णय तज्ज्ञांनी आणि पालकांनी मिळून घ्यायला हवा, असे स्पष्ट मत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अतिशय महत्त्वाचा सामाजिक आणि शैक्षणिक विषय आहे. भाषेच्या संदर्भातील जाणकार, तज्ञ यांचे विचार जाणून घेणे अत्यावश्यक आहे. हा विषय फक्त राजकारण म्हणून हाताळणे योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार मराठीच्या संदर्भात होणाऱ्या मोर्चामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. आमच्या पक्षाकडून ‘कोण’ त्या मोर्चात सहभागी होणार आहे, हे आज किंवा उद्या स्पष्ट केले जाईल. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आमच्यासमोर सर्व लोकांच्या भावना ऐकून घेण्याची जबाबदारी असते. हीच लोकप्रतिनिधीची खरी ताकद आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या पन्नास वर्षांपासून एक प्रथा आहे की, संसद अधिवेशनाच्या आधी राज्यातील खासदारांची मुख्यमंत्री आणि राज्य सरकारसोबत बैठक होत असते. या बैठकीमध्ये राज्यातील महत्त्वाचे प्रश्न संसदेत कसे मांडायचे, यावर चर्चा केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळ देत नाहीत, ही माझी मोठी तक्रार आहे. तेली समाजाच्या प्रश्नांबाबत एक निवेदन माझ्याकडे आले असून, त्या संदर्भात मी वेळ मागितली आहे. तसेच, हिंदी भाषेबाबतही त्यांच्याशी बोलण्याची गरज आहे. शेतीसंदर्भातील कर्जमाफी आणि ‘एक रुपयात कृषी विमा’ या महत्त्वाच्या मुद्यांवरही मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे.