NEET UG 2026 re-exam
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
नीट यूजी २०२६ ची फेरपरीक्षा २१ जून रोजी 'संगणक-आधारित चाचणी' (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) आधीच अनेक समस्यांचा सामना करत असल्याचे न्यायालयाने यावेळी नमूद केले.
सुनावणीच्या सुरुवातीला, राजपूत यांनी स्पष्ट केले की, ते इतर कोणत्याही मागणीचा आग्रह धरत नसून, केवळ फेरपरीक्षा संगणकीय पद्धतीने घेतली जावी या एकाच मागणीवर ठाम आहेत. खंडपीठाने यावेळी नमूद केले की, यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
"ही फेरपरीक्षा संगणकीय पद्धतीने घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एनटीएला आधीच अनेक समस्या भेडसावत आहेत. परीक्षा रद्द करण्यात आली होती आणि आता ती पुन्हा घेतली जात आहे. आम्ही ही याचिका एकतर आताच फेटाळून लावू, किंवा न्यायालयाच्या सुट्ट्या संपल्यानंतर, असे खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडणारे वकील सत्यम सिंह राजपूत यांना सांगितले.
न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने, राजदचे खासदार सुधाकर सिंह आणि इतरांनी दाखल केलेल्या या याचिकेवरील पुढील सुनावणी २७ जुलै रोजी होणार असल्याचे सांगितले.