Supreme Court hijab case verdict File Photo
राष्ट्रीय

Supreme Court : अलाहाबाद हायकोर्टाचा 'हिजाब अनिवार्य नाही' निर्णय 'पूर्वदाखला' मानला जाणार नाही; सुप्रीम कोर्टाची नोटीस

Supreme Court Hijab Case Verdict : न्यायालयाने याचिका प्रलंबित असलेल्या कर्नाटक हिजाब प्रकरणासोबत संलग्न केली

पुढारी वृत्तसेवा

Supreme Court hijab case verdict : "इस्लाममध्ये हिजाब परिधान करणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही," असा निर्वाळा देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाचा हा निकाल बंधनकारक पूर्वदाखला (Precedent) म्हणून मानला जाणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका प्रलंबित असलेल्या कर्नाटक हिजाब प्रकरणासोबत संलग्न केली आहे.

काय घडलं होतं?

प्रयागराजच्या अत्तरसुइया येथील टागोर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सुकैना रिझवी या विद्यार्थिनीने शालेय गणवेशासोबत स्कार्फ (हिजाब) परिधान करण्याचा आग्रह धरल्याने तिला प्रवेश नाकारण्यात आला होता. याविरोधात तिने दाखल केलेली याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. जे. मुनीर आणि न्यायमूर्ती इंद्रजीत शुक्ला यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली होती.

उच्‍च न्‍यायालयाचा निकाल काय ?

मुस्लिम महिलांनी हिजाब परिधान करणे ही इस्लाममधील अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, असे २१ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्‍या निकालात अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच, जर गणवेशाचा नियम सर्वांसाठी समान, प्रामाणिक, भेदभाव न करणारा आणि संस्थेची शिस्त व ओळख टिकवून ठेवणारा असेल, तर विद्यार्थी विहित गणवेशाव्यतिरिक्त इतर कोणतेही वस्त्र परिधान करण्याचा आग्रह धरू शकत नाहीत, असेही न्यायालयाने नमूद केले होते. हिजाबला वगळून गणवेश निश्चित करण्याच्या शैक्षणिक संस्थांच्या अधिकाराला मान्यता देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाच्या २०२२ मधील निकालाचा आधार अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतला होता.

'मुस्लिम वुमेन्स स्टडी सर्कल'च्‍या याचिकेवर सुनावणी

'लाईव्‍हलॉ'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्‍या निकालाविरोधात 'मुस्लिम वुमेन्स स्टडी सर्कल' संघटनेने याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने २० नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. यावेळी "ही याचिका 'सिव्हिल अपील क्रमांक ७०९५/२०२२' सोबत जोडावी आणि उच्च न्यायालयाचा हा निकाल पूर्वदाखला म्हणून ग्राह्य धरला जाऊ नये," असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद काय?

उच्च न्यायालयाचा हा निकाल मनमानी व भेदभावपूर्ण असून तो राज्यघटनेच्या कलम १४, १५, १९(१)(अ), २१ आणि २५ चे उल्लंघन करणारा आहे, असा युक्तिवाद 'मुस्लिम वुमेन्स स्टडी सर्कल'ने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावर विपरीत परिणाम होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.कलम २५ अंतर्गत हिजाब परिधान करण्याच्या अधिकाराला संरक्षण प्राप्त असून, उच्च न्यायालयाने 'अत्यावश्यक धार्मिक प्रथा' कसोटीचा केलेला वापर चुकीचा असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या बंदीचा सर्वाधिक फटका मुस्लिम महिलांना बसत असून, शिखांच्या पगडीसह इतर समुदायांच्या धार्मिक प्रतीकांना मात्र वेगळी वागणूक दिली जाते, असा दावाही करण्यात आला आहे.

धार्मिक श्रद्धांच्या संरक्षणाबाबत तत्त्वांचा योग्य विचार नाही

सद्सद्विवेकबुद्धीने पाळल्या जाणाऱ्या धार्मिक श्रद्धांच्या संरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 'शिरूर मठ' आणि 'बिजोय इमॅन्युएल' खटल्यांत घालून दिलेल्या तत्त्वांचा उच्च न्यायालयाने योग्य विचार केला नसल्याचे याचिकेत नमूद केले आहे.दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हिजाब निकालाविरोधातील अपिलांवर सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२२ मध्ये विभागलेला (Split Verdict) निकाल दिला होता. त्यावेळी न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी अपिले फेटाळली होती, तर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी ती मंजूर केली होती. त्यानंतर हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले असून ते अद्याप प्रलंबित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT