Supreme Court on premarital physical relations
"कदाचित आम्ही जुन्या विचारांचे असू शकतो; पण लग्नापूर्वी तरुण आणि तरुणी अनोळखी असतात. त्यांच्या नात्यातील बारीक-तणाव काहीही असोत लग्नापूर्वी ते शारीरिक संबंध कसे ठेवू शकतात," असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने लग्नाच्या आमिषाने बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जमीन अर्जावरील सुनावणीवेळी केला. लग्नापूर्वी कोणीही कोणावर विश्वास ठेवू नये, असा सल्लाही यावेळी न्यायालयाने दिला.
तक्रारदार महिला आणि आरोपीची ओळख २०२२ मध्ये एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटद्वारे झाली होती.आरोपीने लग्नाचे आश्वासन दिल्याने महिलेने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेच्या संमतीशिवाय त्यांचे खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. नंतर दुसऱ्याच महिलेशी विवाह केला, असा दावा सरकारी पक्षाने केला. आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांनी नमूद केले की, "कदाचित आम्ही जुन्या विचारांचे असू शकतो... पण विवाहापूर्वी मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी अनोळखी असतात. त्यांच्यातील नाते कितीही घट्ट असले, तरी विवाहापूर्वी ते शारीरिक संबंध कसे काय ठेवू शकतात, हे आम्हाला समजत नाही. प्रत्येकाने खूप सावध राहायला हवे. लग्नापूर्वी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये."
न्यायमूर्ती नागरत्ना यांनी महिलेने विवाहापूर्वी दुबईला जाण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारी वकिलांनी जेव्हा 'लग्नाचे नियोजन असल्याने ते भेटले' असे सांगितले, तेव्हा खंडपीठाने स्पष्ट केले की, "जर तरुणी विवाहाबाबत इतकी गंभीर होती, तर तिने लग्नापूर्वी प्रवासाला जायला नको होते. जेव्हा संमतीने संबंध प्रस्थापित होतात, तेव्हा अशा प्रकरणांमध्ये खटला चालवून शिक्षा देणे योग्य ठरणार नाही. आम्ही हे प्रकरण मध्यस्थीसाठी पाठवू." आता या प्रकरणा पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.