Monsoon Update 
राष्ट्रीय

Monsoon Update | यंदा मान्सून एक्स्प्रेस सुसाट! जूनमध्ये सरासरीच्या १०८ टक्के पाऊस पडणार

जूनमध्ये कसा राहील पाऊस, जाणून घ्या सविस्तर

दीपक दि. भांदिगरे

Monsoon Update

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून यंदा वेळेआधीच दाखल झाला. सध्या राज्यात सर्वदूर पावसाचा जोर सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी (दि.२७) मान्सून हंगामातील पावसाबाबतचा नवा अंदाज जारी केला.

संपूर्ण देशभरात यंदा मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हे प्रमाण ४ टक्के कमी-जास्त असू शकते. जे एकूणच २०२५ मधील जून ते सप्टेंबर दरम्यानच्या मान्सून हंगामात देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे दर्शवते.

जूनमध्ये देशात दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार

मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त (>१०६ टक्के ), वायव्य भारतात सामान्य (>९२-१०८ टक्के ) आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी (<९४ टक्के) राहण्याची शक्यता आहे.

यंदाच्या हंगामात देशातील बहुतांश शेती क्षेत्रांचा समावेश असलेल्या मान्सून कोअर झोन (MCZ) मध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त (>106 टक्के) असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मान्सून कोअर झोनमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि आजूबाजूचा भाग येतो. हा भाग मान्सून हंगामात पडणाऱ्या पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. हा पाऊस शेतीसाठी महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट

दरम्यान, महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसाठी २८ मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्याचे घाट क्षेत्र, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तर ठाणे, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी ४०-५० किमी वेगाने वारे आणि जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT