भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली  
राष्ट्रीय

Sourav Ganguly |प. बंगालमध्‍ये सरकार बदलताच सौरव गांगुलीच्या सुरक्षेत कपात!

Sourav Ganguly security downgraded | ममता बॅनर्जी सरकारच्या काळात मिळाली होती 'झेड' सुरक्षा

पुढारी वृत्तसेवा

Sourav Ganguly security downgraded

कोलकाता: पश्चिम बंगालमधील सत्ताबदलानंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार गांगुली यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून ती 'झेड' (Z) श्रेणीवरून 'वाय' (Y) श्रेणीवर आणली आहे. सौरव गांगुली सध्या क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे, बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नेते आणि खासदारांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. गांगुली यांना २०२३ पर्यंत 'वाय' श्रेणीचीच सुरक्षा मिळाली होती, मात्र तत्कालीन ममता बॅनर्जी सरकारने त्यांची सुरक्षा वाढवून ती 'झेड' श्रेणीची केली होती.

राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

सौरव गांगुली यांच्या सुरक्षेत करण्यात आलेल्या या कपातीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, शुभेंदु सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, विशेष सुरक्षा केवळ अशाच व्यक्तींना दिली जाईल, ज्यांच्या जीवाला खरोखरच धोका असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या अहवालात स्पष्ट होईल.

पश्चिम बंगालच्या सुरक्षा यंत्रणांनी घेतला सुरक्षेचा आढावा

पश्चिम बंगालच्या सुरक्षा यंत्रणांनी विविध व्हीआयपी (VIP) व्यक्तींना देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. या अंतर्गत गांगुली यांच्या सुरक्षा गरजांचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले आणि त्यानुसार सुरक्षा श्रेणीत बदल करण्यात आला.

आता किती सुरक्षा रक्षक तैनात असणार?

मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये तत्कालीन ममता बॅनर्जी सरकारने सौरव गांगुली यांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा दिली होती. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी ३० ते ३५ पोलीस कर्मचारी तैनात असायचे आणि त्यांच्या ताफ्यासोबत पायलट वाहनही चालत असे. 'झेड प्लस' श्रेणीमध्ये ३६ सुरक्षा रक्षक तैनात असतात, ज्यात १० एसपीजी (SPG) किंवा एनएसजी (NSG) कमांडो आणि उर्वरित राज्य पोलीस दलाचे जवान असतात. तर दुसरीकडे, 'वाय' श्रेणीमध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या अवघी ११ असते, ज्यामध्ये दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) समाविष्ट असतात.

टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणना

सौरव गांगुली यांची भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणना केली जाते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गांगुली यांनी क्रिकेट प्रशासक म्हणूनही यशस्वी भूमिका बजावली. त्यांनी बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्षपदही भूषवले असून सध्या ते क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. दरम्यान, अनेक राजकीय पक्षांनी सौरव गांगुली यांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु गांगुली यांनी अद्याप तरी राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT