भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी 'दूसरा' (Doosra) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  Pudhari Photo
राष्ट्रीय

Sourav Ganguly : लॉर्ड्सवरील 'शर्टलेस' सेलिब्रेशनवर हक्क सांगत सौरव गांगुलींची हायकोर्टात धाव; नेमकं काय आहे प्रकरण?

'दूसरा' चित्रपटाच्या रिलीजवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

नंदू लटके

Sourav Ganguly Doosra movie controversy : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी 'दूसरा' (Doosra) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि अधिकारांचा अनधिकृत वापर होत असल्याचा दावा गांगुली यांनी केला आहे. तथापि, गुरुवारी झालेल्या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

चित्रपटाच्या रिलीजवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

बार अँड बेंचने दिलेल्‍या वृत्तानुसार, न्यायाधीश दिनेश शर्मा यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाने चित्रपटाच्या थिएटरमधील प्रदर्शनावर कोणतीही बंदी घातलेली नाही. "मी कोणत्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे चित्रपट निर्धारित वेळेत प्रदर्शित होऊ शकतो," असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

काय आहे प्रकरण?

सौरव गांगुली आणि चित्रपट निर्मिती संस्था 'लव फिल्म्स एलएलपी' यांनी संयुक्तपणे उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गांगुली यांच्या आयुष्यातील प्रत्यक्ष घटना, विशेषतः नॅटवेस्ट क्रिकेट मालिकेचा अंतिम सामना आणि लॉर्ड्सच्या मैदानावर त्यांनी केलेले ऐतिहासिक शर्टलेस सेलिब्रेशन यांचा चित्रपटात व्यावसायिक वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

व्यावसायिक गैरवापर असल्याचा दावा

गांगुलींच्या 'पर्सनालिटी राईट्स' (व्यक्ती म्हणून असलेले कायदेशीर हक्क) आणि त्यांच्या प्रस्तावित बायोपिकवर निर्मिती संस्थेचे असलेले विशेष करारविषयक हक्क डावलून हा व्यावसायिक गैरवापर करण्यात येत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. गांगुली आणि 'लव फिल्म्स'ने चित्रपटाच्या थिएटरमधील, डिजिटल तसेच इतर माध्यमांवरील प्रदर्शनावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. चित्रपटाच्या प्रचारासाठी गांगुलींचे नाव, छायाचित्र आणि त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील आयकॉनिक क्षणांचा अनधिकृत वापर रोखण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

कराराचा वाद आणि निर्मात्यांची बाजू

याचिकाकर्त्यांनुसार, ५ ऑगस्ट २०२१ रोजी सौरव गांगुली यांनी 'लव फिल्म्स'सोबत एक करार केला होता. याद्वारे निर्मिती संस्थेला गांगुलींच्या जीवनावर आणि क्रिकेट कारकिर्दीवर आधारित चरित्रपटासह (बायोपिक) दृक्-श्राव्य सामग्री विकसित करण्याचे आणि व्यावसायिक लाभ घेण्याचे अनन्य अधिकार मिळाले आहेत. 'दादा - द सौरव गांगुली Story' नावाच्या या अधिकृत बायोपिकवर मोठी गुंतवणूक करण्यात आली असून, हा चित्रपट १४ मे २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

'दूसरा' चित्रपटावरून वाद काय?

१२ ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या 'दूसरा' चित्रपटाचा ट्रेलर आणि प्रचार मोहिमेत गांगुलींचे कर्णधारपद आणि २००२ मधील नॅटवेस्ट मालिकेच्या ऐतिहासिक विजयाचा ठळकपणे उल्लेख करण्यात आला आहे. यात लॉर्ड्सच्या गॅलरीतील त्यांच्या शर्टलेस सेलिब्रेशनच्या दृश्यांचाही समावेश आहे. गांगुली यांच्या लोकप्रियतेचा गैरवापर करून प्रेक्षकांचा व्यावसायिक लाभ उठवण्याचा आणि या चित्रपटाशी गांगुलींचा संबंध असल्याचा चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचा दावा वकिलांनी केला.याशिवाय, १३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अभिनय देव यांनी, नॅटवेस्ट मालिकेचा अंतिम सामना आणि गांगुलींच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांमुळे चित्रपटातील 'तारा' या काल्पनिक पात्राला कशी प्रेरणा मिळाली, याबाबत चर्चा केली होती, असा दाखलाही याचिकेत देण्यात आला आहे.

गांगुलींचे वकील काय म्हणाले?

गांगुली यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, हा चित्रपट त्यांच्या व्यक्तिमत्त्व अधिकारांचे उल्लंघन करतो आणि यासाठी माजी क्रिकेटपटूची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. चित्रपटात गांगुलींना 'स्युडो हिरो' (आभासी नायक) म्हणून दाखवण्यात आले असून ट्रेलरचा जवळपास एक तृतीयांश भाग गांगुलींच्या फुटेजवर आधारित आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.

चित्रपट निर्मात्यांचा दावा काय?

दरम्यान, चित्रपट निर्मात्यांच्या वकिलांनी हा चित्रपट गांगुलींवर आधारित बायोपिक असल्याचा दावा फेटाळून लावला. राजस्थानमधील एका मुलीची ही कथा असून ती गांगुलींपासून प्रेरणा घेते, असे न्यायालयात सांगण्यात आले. तसेच, नॅटवेस्ट मालिकेच्या फुटेजचा वापर करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) कायदेशीर परवाना घेण्यात आला असून, अशा फुटेजवर कोणत्याही वैयक्तिक खेळाडूचा अधिकार नसतो, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT