लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची गळाभेट घेतली.  
राष्ट्रीय

Delimitation Bill 2026 : सोनिया आणि राहुल गांधींनी घेतली एम. के. स्टॅलिन यांची भेट; 'डिलिमिटेशन'वर चर्चा

द्रमुकने विधेयकाला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर भेटीला आले महत्त्‍व

पुढारी वृत्तसेवा

Rahul Gandhi meets MK Stalin : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी चेन्नई येथे द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे प्रमुख आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍या सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्‍थित होते.

स्टॅलिन यांच्या निवासस्थानी बैठक

अलवरपेट येथील स्टॅलिन यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ फेररचना (डिलिमिटेशन) विधेयकाला द्रमुकने दिलेला पाठिंबा मागे घ्यावा, यासाठी स्टॅलिन यांची मनधरणी करणे हा या भेटीमागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. द्रमुकने या विधेयकाला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या एका दिवसात ही भेट झाली आहे. काँग्रेसने या प्रस्तावित घटनादुरुस्तीविरोधात तीव्र मोहीम उघडली असताना, या भेटीमुळे दोन्ही पक्षांतील वाढते मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

विरोधी पक्षांच्या नेत्यांची स्टॅलिन यांच्याशी चर्चा

स्टॅलिन यांनी आपल्या निवासस्थानी या सर्व नेत्यांचे स्वागत केले. यावेळी द्रमुकच्या वतीने पक्षाच्या युवा शाखेचे सचिव उदयनिधी स्टॅलिन, ज्येष्ठ नेत्या कनिमोळी, दयानिधी मारन आणि अनेक खासदार उपस्थित होते. मतदारसंघ फेररचनेच्या प्रक्रियेवरून काँग्रेस आणि द्रमुकमध्ये जाहीर मतभेद सुरू असतानाच ही चर्चा झाली आहे.

स्‍टॅलिन यांनी बैठकीपूर्वीच स्‍पष्‍ट केली होती भूमिका

काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीच्या काही तास आधीच, द्रमुक अध्यक्षांनी तमिळनाडू प्रति असलेल्या आपल्या मूलभूत जबाबदारीपासून पक्ष मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले होते. राहुल गांधी यांच्या आवाहनाला उत्तर देताना स्टॅलिन यांनी राज्याच्या इतिहासातील आणि लोककथांमधील दोन पात्रांचा उल्लेख केला.राहुल यांचा 'बंधू' असा उल्लेख करत स्टॅलिन म्हणाले की, द्रमुकचे राजकीय निर्णय नेहमीच प्रामुख्याने तमिळनाडू आणि तेथील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवूनच घेतले गेले आहेत. राज्याचे हित किंवा राज्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याच्या बाबतीत पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही, असेही स्‍पष्‍ट केले होते.

आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही" : स्टॅलिन

सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये स्टॅलिन यांनी लिहिले की, "आम्ही या मार्गावर कोणतीही तडजोड करणार नाही. इतिहास आम्हाला 'कट्टाबोम्मन' म्हणून लक्षात ठेवेल, 'एट्टाप्पन' म्हणून नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे."संविधान आणि संघराज्य तत्त्वांच्या रक्षणासाठी द्रमुकने दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची दखल घेतल्याबद्दल स्टॅलिन यांनी राहुल गांधींचे आभार मानले. मात्र, पक्षाचे पुढील निर्णयही तमिळनाडू आणि तमिळ जनतेच्या हितावरच आधारित असतील, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

भेटीपूर्वी राहुल गांधींनीही एक्‍स पोस्‍ट करत केले होते आवाहन

भेटीपूर्वी 'एक्स' पोस्‍टमध्‍ये राहुल गांधी यांनी म्हटले होते की, लोकसभा जागांची संख्या वाढवून ८५० करण्याचा भारतीय लोकशाहीवर गंभीर परिणाम होईल. या प्रस्तावित बदलांमुळे भाजप आणि आरएसएसला निवडणूक सीमा स्वतःच्या फायद्यानुसार पुन्हा आखण्याची मोठी संधी मिळू शकते, असा दावा त्यांनी केला होता."जागांची संख्या वाढवून ८५० केल्याने भारतातील लोकशाही संपुष्टात येईल. यामुळे भाजप-आरएसएसला भारताचा संपूर्ण निवडणूक नकाशा स्वतःच्या फायद्यासाठी पुन्हा तयार करण्याची अमर्याद सूट मिळेल," असे राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT