File Photo
राष्ट्रीय

Sonia Gandhi Autobiography : सोनिया गांधींचे आत्मचरित्र आता 'हार्परकॉलिन्स इंडिया' करणार प्रकाशित

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने दिला होता प्रकाशसनास नकार

पुढारी वृत्तसेवा

Sonia Gandhi Autobiography : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या 'बिलॉगिंग' (Belonging) या आगामी आत्मकथनात्मक पुस्तकाच्या भारतातील प्रकाशनावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता या आत्मचरित्राचे प्रकाशन आता 'हार्परकॉलिन्स इंडिया' करणार आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडिया आणि सोनिया गांधी यांच्यातील करारात अडसर निर्माण झाल्याच्या वृत्तानंतर एका आठवड्यातच हार्परकॉलिन्स इंडियाने या पुस्तकाच्या प्रकाशनाची अधिकृत घोषणा केली आहे.

१० नोव्‍हेंबर रोजी पुस्‍तक प्रकाशित होणार

प्रकाशक कंपनी 'हार्परकॉलिन्स इंडिया'ने 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली की, हे पुस्तक १० नोव्हेंबर २०२६ रोजी भारतात प्रकाशित होईल. पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, "आपल्या काळातील सर्वात बहुप्रतिक्षित राजकीय आत्मचरित्रांपैकी एक असलेले ‘बिलॉगिंग’ हे प्रेम, ओळख, कर्तव्य आणि आपुलकीची एक नाट्यमय आणि अत्यंत वैयक्तिक कहाणी आहे. हे पुस्तक भारताच्या प्रवासाचा एक दुर्मिळ अंतर्गत दृष्टिकोन मांडते."

'पेंग्विन इंडिया'ला हवे होते संपादकीय बदल

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाला पुस्तकाच्या हस्तलिखितात काही संपादकीय बदल करायचे होते. ही अट मान्‍य करण्‍यास सोनिया गांधी यांनी नकार दिला होता. पेंग्‍विन रँडम हाऊस प्रकाशनाच्‍या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर अनेक भारतीय प्रकाशकांनी या पुस्तकासाठी उत्सुकता दाखवली होती, अखेर यामध्‍ये हार्परकॉलिन्स इंडियाने बाजी मारली आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १,००,००० प्रतींची असेल.

सोनिया गांधी यांच्‍या आयुष्‍यातील सर्वात महत्त्‍वाचा दस्‍तावेज

सोनिया गांधी यांनी यापूर्वीही अनेक पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले आहे, परंतु या पुस्तकाशी जोडलेल्या घटकांच्या मते, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात वैयक्तिक आणि महत्त्वाचा दस्तावेज आहे. प्रकाशकाने याला जगातील एका प्रमुख महिला नेत्याची अत्यंत रंजक आत्मकथा म्हटले आहे.

काँग्रेसचा सरकारवर दबावाचा आरोप

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी असा आरोप केला होता की, सोनिया गांधी यांच्या पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि मोदी सरकारच्या काळात चीनने भारतीय जमिनीवर केलेले अतिक्रमण यांशी संबंधित भाग हटवण्यासाठी पेंग्विन इंडियावर दबाव आणला गेला होता.राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, "हा थेट सरकारी हस्तक्षेप आहे. सरकार एका व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करू इच्छिते. सोनिया गांधी या देशाच्या मोठ्या नेत्या आहेत; त्या तथ्य मांडत आहेत, कोणतीही काल्पनिक कहाणी नाही. तुम्ही तथ्यांवर बंदी कशी घालू शकता?"

आंतरराष्‍ट्रीय प्रकाशनावर परिणाम नाही

भारतातील वादाचा आंतरराष्ट्रीय प्रकाशनावर कोणताही परिणाम झालेला नाही. 'पेंग्विन रँडम हाऊस'चा भाग असलेल्या 'अॅलफ्रेड ए नॉफ' द्वारे हे पुस्तक १० नोव्हेंबर २०२६ रोजी जागतिक स्तरावर १ लाख प्रतींच्या पहिल्या आवृत्तीसह प्रकाशित होईल. या पुस्तकात सोनिया गांधी यांचा इटलीतील बालपणापासूनचा प्रवास, राजीव गांधी यांच्याशी झालेला विवाह, नेहरू-गांधी कुटुंबातील आयुष्य, तसेच संजय गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या निधनाचे वैयक्तिक आघात आणि त्यानंतरचा राजकीय प्रवेश यावर प्रकाश टाकला आहे. २००४ मध्ये युपीएला बहुमत मिळूनही पंतप्रधानपद नाकारण्याच्या त्यांच्या निर्णयाचाही यात समावेश असेल. "माझ्या कुटुंबाबद्दल खूप काही लिहिले गेले आहे, पण काहींनाच त्यांच्या भावना आणि कृतींमागील सत्य मांडता आले. मी सहा दशकांत पाहिलेल्या सामाजिक व राजकीय बदलांचा हा एक वेगळा दृष्टिकोन आहे," असे सोनिया गांधी यांनी प्रकाशनाच्या निवेदनात म्हटले आहे.

पेंग्विन अन्‍य पुस्‍तकांमुळेही वादाच्‍या भोवर्‍यात

पेंग्विन रँडम हाऊस इंडिया अलीकडच्या काळात इतर काही पुस्तकांमुळेही वादात सापडले आहे. माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांचे 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' हे पुस्तक राहुल गांधी यांनी संसदेत दाखवल्यानंतर पेंग्विनने ते छापले नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच जून महिन्यात मुझफ्फरनगर दंगलीवर आधारित जो साको यांचे 'द वन्स अँड फ्युचर राईट' हे ग्राफिक्स पुस्तक कायदेशीर आणि भारताच्या नकाशातील त्रुटींच्या कारणास्तव मागे घेण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT