Sonam Wangchuk Hunger Strike Pudhari
राष्ट्रीय

Sonam Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस; डॉक्टरांचा अवयव निकामी होण्याचा इशारा, प्रकृती चिंताजनक

Sonam Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस असून, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचा इशारा दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sonam Wangchuk Hunger Strike: शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस आहे. सलग 20 दिवस अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली असून, डॉक्टरांनी अवयव निकामी होण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, उपोषण सुरू झाल्यापासून सोनम वांगचुक यांचे 9 किलोहून अधिक वजन कमी झाले आहे. त्यांचे सध्याचे वजन 56.9 किलो इतके आहे. शरीरातील ग्लुकोज आणि चरबीचा साठा संपल्यानंतर आता शरीर ऊर्जेसाठी स्नायूंचा वापर करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या शरीरातील युरिक ॲसिडची पातळीही मोठ्या प्रमाणात वाढली असून, स्नायू झपाट्याने कमजोर होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

दरम्यान, या प्रकरणाची दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली आहे. एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रशासनाला सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर दररोज लक्ष ठेवण्याचे आणि प्रकृती खालावल्यास तातडीने आवश्यक उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकाचा जीव सर्वात महत्त्वाचा असून, तो वाचवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मात्र डॉक्टरांच्या गंभीर इशाऱ्यानंतरही सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. त्यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे आपल्या समर्थकांना 20 जुलै रोजी होणाऱ्या प्रस्तावित संसद मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातील अनेक राजकीय नेते, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी जंतर-मंतर येथे जाऊन त्यांची भेट घेतली आणि केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन केले.

याशिवाय संगीतकार विशाल ददलानी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, लेखिका शोभा डे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत उपोषण संपवण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) नेही पत्र लिहून सोनम वांगचुक यांनी आरोग्याचा विचार करून उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT