नवी दिल्ली: सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत वांगचुक यांच्या अटकेला आव्हान देत त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करणारी याचिका गीतांजली यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी झालेल्या निदर्शनांमध्ये चार जणांचा मृत्यू आणि ९० जण जखमी झाले. या हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपांखाली २६ सप्टेंबर रोजी वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) ताब्यात घेण्यात आले. ते राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात आहेत. ज्येष्ठ वकील विवेक टंखा आणि वकील सर्वम रितम खरे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत गीतांजली यांनी वांगचुक यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला सोनम वांगचुक यांना न्यायालयात तात्काळ हजर करण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेत केली आहे.
याचिकेत केंद्रीय गृह मंत्रालय, लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासन, लेहचे उपायुक्त आणि जोधपूर तुरुंग अधीक्षक यांना पक्षकार बनवण्यात आले आहे. गीतांजली यांना वांगचुक यांच्याशी फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटून तात्काळ संपर्क साधण्याची परवानगी देण्याचे निर्देश देण्याची मागणी देखील याचिकेत करण्यात आली आहे. अटकेचा आदेश, अटकेची कारणे आणि त्यासंबंधीचे सर्व कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.