Sonam Wangchuk Hunger Strike Pudhari
राष्ट्रीय

Sonam Wangchuk Strike: 'इतिहास माफ करणार नाही'; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर CJPचे देशाला खुले पत्र; काय आहे पत्रात?

Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला CJP ने जाहीर पाठिंबा देत देशवासीयांना खुलं पत्र लिहिलं आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) या पार्श्वभूमीवर देशवासीयांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रातून पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरव दास यांनी नागरिकांना मौन न बाळगता पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

पत्रात सौरव दास यांनी दावा केला की, सोनम वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असूनही त्यांच्या आंदोलनाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यांनी म्हटले की, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीला स्वतःचा जीव धोक्यात घालून सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवावा लागत असेल, तर ती चिंतेची बाब आहे.

सौरव दास यांनी आपल्या पत्रात सोनम वांगचुक यांच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांनी आरामदायी जीवनाचा मार्ग न निवडता समाजासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उपोषण करावे लागत असल्याबद्दल सौरव दास यांनी खंत व्यक्त केली.

पत्रात त्यांनी देशातील नागरिकांनाही प्रश्न विचारला आहे. "जर आपण आज त्यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही, तर सोनम वांगचुक यांनी भारतासाठी काय केले हे विचारणार नाही, तर भारताने सोनम वांगचुक यांच्यासाठी काय केले, हा प्रश्न इतिहास विचारेल," असे त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय, समाजात अन्यायाविरोधातील संवेदनशीलता कमी होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अन्याय पाहूनही शांत राहणे, सहानुभूतीपेक्षा उदासीनता स्वीकारणे आणि इतर कोणी तरी आवाज उठवेल अशी मानसिकता वाढत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.

सौरव दास यांनी सोनम वांगचुक यांची माफी मागत, त्यांच्या सारख्या व्यक्तीला स्वतःच्या जीवाची बाजी लावून आंदोलन करावे लागत आहे, ही देशासाठी दुर्दैवी बाब असल्याचे म्हटले आहे. सत्तेपेक्षा संवेदनशीलता आणि सहानुभूती महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक आणि CJP ला पाठिंबा देत म्हणले की, "मी शिवसेनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दीप यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे. देशाच्या शिक्षण व्यवस्थेशी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या प्रश्नांवर सरकारने गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी आमची भूमिका आहे,".

दरम्यान, CJP ने 20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली असून, हा मोर्चा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचा दावा पक्षाने केला आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत आणि CJP च्या मागण्यांबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT