

नवी दिल्ली : पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण रविवारी १५ व्या दिवशीही सुरूच असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचे वजन ७.८ किलोने घटले असून रक्तदाबही कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कथित परीक्षा गैरव्यवहार विरोधात जंतरमंतर येथे सुरू असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचा आज २३ वा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वांगचुक यांनी २८ जूनपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. रविवारी (दि. १२) डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी केली. यावेळी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ६० पर्यंत तसेच रक्तदाब १०४/६६ मिमी एचजीपर्यंत खाली आल्याचे आढळले.
शनिवारी वांगचुक यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून लोकांना इतरांमध्ये नायक न शोधण्याचे तसेच २० जुलै रोजी आयोजित संसद मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, सीपीआय (एमएल) लिबरेशनशी संलग्न ‘ऑल इंडिया स्टुडंटस् असोसिएशन’चे सदस्य नेहा, मनीष, दीपक कुमार वर्मा व आमीन यांनीही आंदोलनस्थळी आपले स्वतंत्र बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे.