नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरने युद्ध पद्धतीमध्ये क्रांतीकारक बदल घडवून आणला. यामुळे विविध आघाड्यांवरील युद्धासाठी भारताची क्षमता सिद्ध झाली, असे प्रतिपादन कर्नल सोफिया कुरेशी यांनी केले. दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथील 'चाणक्य डिफेन्स डायलॉग: यंग लीडर्स फोरम' कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानने माहितीच्या आघाडीवर युद्ध देखील सुरु केले होते. पाकिस्तानने चुकीची आणि खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. त्याला आपण योग्य ते उत्तर दिले. त्यामुळे चुकीच्या आणि खोट्या माहितीपासून सतर्क राहण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी शैक्षणिक संस्थांसह तरुणांमध्ये डिजिटल साक्षरता अधिक गरजेची आहे, असे आवाहन यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी केले.
राष्ट्राच्या विकासात ‘शस्त्र’ आणि ‘शास्त्र’ दोन्ही महत्वाचे
ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांमधील समन्वय, एकजुटता, एकात्मता आणि आत्मनिर्भरतेचे असाधारण प्रदर्शन होते, असे त्या म्हणाल्या. आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर ‘एआय’सारख्या विशिष्ट तंत्रज्ञानासह तरुण अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन घडवत आहे. आयआयटी, डीआरडीओ आणि विविध संस्थांशी संपर्क साधून अनेक प्रकल्प राबवले जात आहेत, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले. राष्ट्राच्या विकासात शस्त्र आणि शास्त्र दोन्ही महत्वाचे असतात, असे त्या म्हणाल्या.
युद्ध फक्त गोळ्यांनी लढले जात नाहीत
कर्नल कुरेशी तरुणांना उद्देशून म्हणाल्या, तुम्ही भारताची युवा शक्ती आहात- फक्त गोळीबारातच नाही तर फायरवॉलमध्येही प्रशिक्षित आहात. आता युद्धे फक्त बंकर किंवा गोळ्यांनी नाही तर बाइट्स आणि बँडविड्थने लढली जात आहेत. तरुणांनी चपळ आणि सतर्क, धाडसी, सक्षम, चारित्र्यवान असले पाहिजे. ज्ञान आणि नवोन्मेष, शिस्त आणि गतिमान, प्रामाणिक आणि योगदानकर्ता बनले पाहिजे, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले.