Pakistan Ceasefire Violation : जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याने सलग १३ व्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पूंछ, राजौरी आणि उरी येथे पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. गोळीबारात घरांचेही नुकसान झाले आहे. उत्तर काश्मीरमधील तंगधार येथील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमधील नागरिकांना लक्ष्य केले आहे. तोफखान्यांच्या गोळीबारात एका काश्मिरी नागरिकाचे संपूर्ण घर जळून खाक झाले. भारतीय लष्करानेही या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
६ आणि ७ मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्यांवरून जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात जोरदार गोळीबार केला. तंगधारमध्ये नियंत्रण रेषेजवळ अंदाधुंद गोळीबार झाला. पूंछमध्ये पाकिस्तानने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा नागरिकांचा मृत्यू झाला. २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
भारतीय लष्कराच्या अधिकार्यांनी सांगितले की, पुंछ जिल्ह्यातील मानकोट भागात एका महिलेच्या घरावर मोर्टारचा गोळीबार झाला. १३ वर्षांची मुलगी जखमी झाली. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पुंछच्या विविध भागात १२ इतर नागरिक जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. राजौरीतील थंडीकास्सी येथे पाकिस्तानच्या गोळीबारात दोन महिलांसह चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच वेळी, मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीन मुलांसह किमान दहा नागरिक जखमी झाले आणि अनेक घरांचे नुकसान झाले.
स्थानिक सूत्रांनी सांगितले की, उरीमधील सलामाबाद येथील नौपोरा आणि कलगे भागात गोळीबार करण्यात आला, ज्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आणि दहशत निर्माण झाली. त्यांनी सांगितले की, नऊ जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार तीव्र होता. अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी पळून जावे लागले," असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
मानकोट व्यतिरिक्त, जम्मू प्रदेशातील राजौरी जिल्ह्यातील पूंछ, लाम, मंजाकोट आणि गंभीर ब्राह्मणा येथील कृष्णा घाटी आणि शाहपूर सेक्टरमध्ये आणि उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यातील कर्नाह आणि उरी सेक्टरमध्ये सीमेपलीकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले.
जम्मू प्रदेशातील पाच सीमावर्ती जिल्ह्यांमधील सर्व शैक्षणिक संस्था बुधवारी बंद राहतील, असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सध्याच्या परिस्थितीमुळे, जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आज बंद राहतील.