SIM card File Photo
राष्ट्रीय

SIM card warning: तुमच्या नावावरचं SIM दुसऱ्याला देताय? सावधान! ३ वर्षांचा तुरुंगवास, ५० लाखांपर्यंत दंड

आपल्या नावावर असलेले सिमकार्ड दुसऱ्याला देणे किंवा विकणे आता महागात पडू शकते. या सिमचा वापर बेकायदा कृत्यांसाठी झाल्यास मूळ ग्राहकावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.

मोहन कारंडे

SIM card warning

नवी दिल्ली : आपल्या नावावर असलेले सिमकार्ड दुसऱ्याला देणे किंवा विकणे आता महागात पडू शकते. बनावट पद्धतीने सिमकार्ड जारी करणे, दूरसंचार ओळख क्रमांकाचा गैरवापर करणे किंवा आयएमईआय क्रमांकात छेडछाड करणे यांसारख्या प्रकारांमध्ये तीन वर्षांपर्यंत कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असा इशारा दूरसंचार विभागाने सोमवारी दिला आहे.

मध्य प्रदेश परवाना सेवा क्षेत्रात (एलएसए) बनावट पद्धतीने सिमकार्ड जारी केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर दूरसंचार विभागाने ही सूचना जारी केली. तपासात छत्तीसगडमधील एका पॉइंट ऑफ सेल एजंटने नागरिकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून तब्बल २५ मोबाइल कनेक्शन जारी केल्याचे आढळून आले. त्यानंतर दूरसंचार विभाग आणि संबंधित दूरसंचार कंपन्यांनी या पीओएस एजंटला काळ्या यादीत टाकले. तसेच त्याच्याकडून भविष्यात नवीन सिमकार्ड जारी करण्यास बंदी घालण्यात आली.

संशयित २५ क्रमांकांची पुन्हा तपासणी

पीओएस एजंटने जारी केलेल्या २५ मोबाइल क्रमांकांची दूरसंचार विभागाच्या डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. संशयित क्रमांकांची पुन्हा पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत पडताळणी अयशस्वी ठरलेल्या क्रमांकांचे कनेक्शन बंद करण्यात आले.

आयएमईआय क्रमांकात छेडछाडही गुन्हा

मोबाइल फोनचा आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख क्रमांक अर्थात आयएमईआय बदलणे किंवा छेडछाड केलेला आयएमईआय क्रमांक असलेले उपकरण वापरणे हा दंडनीय गुन्हा आहे. दूरसंचार अधिनियम, २०२३ अंतर्गत अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाईची तरतूद आहे, असे विभागाने स्पष्ट केले.

सिमचा गैरवापर झाल्यास ग्राहकही जबाबदार

आपल्या नावावर जारी केलेले सिमकार्ड दुसऱ्या व्यक्तीला देणे, विकणे किंवा हस्तांतरित करणे टाळावे, असे आवाहन दूरसंचार विभागाने केले आहे. संबंधित सिमचा वापर सायबर फसवणूक किंवा अन्य बेकायदा कृत्यासाठी झाल्यास त्याची कायदेशीर जबाबदारी मूळ ग्राहकावरही येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी ‘संचार साथी’ पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या नावावर किती मोबाइल कनेक्शन सुरू आहेत, याची नियमित तपासणी करावी, असा सल्ला विभागाने दिला आहे.

छेडछाड करता येणारी उपकरणे वापरू नका

आयएमईआय क्रमांक बदलता किंवा त्यात छेडछाड करता येणारे मॉडेम, मॉड्यूल, सिम बॉक्स किंवा अन्य उपकरणे वापरू नयेत, तसेच अशी उपकरणे तयार करून घेऊ नयेत, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. बनावट कागदपत्रे, फसवणूक किंवा खोटी माहिती देऊन सिमकार्ड मिळवणे, तसेच आपल्या नावावर घेतलेले सिम अशा व्यक्तींना देणे, विकणे किंवा हस्तांतरित करणे टाळावे, ज्यांच्याकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अ‍ॅपद्वारे ओळख बदलणेही बेकायदा

कॉलिंग लाइन आयडेंटिटी किंवा दूरसंचार ओळखीशी संबंधित माहिती बदलण्यासाठी मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट किंवा अन्य माध्यमांचा वापर करणेही कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असल्याचे विभागाने सांगितले. आपल्या नावावर सिमकार्ड घेऊन ते पुढे सायबर फसवणूक किंवा अन्य बेकायदा कृत्यांसाठी वापरण्यास देणे, भाड्याने देणे किंवा त्याचा गैरवापर होऊ देणे यामुळे मूळ ग्राहकावर कायदेशीर जबाबदारी येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT