मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या. सोबत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार. Pudhari
राष्ट्रीय

Siddaramaiah Resigns |'राज्यसभेची ऑफर नाकारली, राज्‍याच्‍या राजकारणातच कार्यरत राहणार : सिद्धरामय्यांची स्‍पष्‍टोक्‍ती

Siddaramaiah resigns as Karnataka CM | 'मी दिलेला शब्द पाळला': मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना झाले भावूक

पुढारी वृत्तसेवा

Siddaramaiah resigns as Karnataka CM

बंगळूरु : "मी सक्रिय राजकारणातच कार्यरत राहीन. मला राष्ट्रीय राजकारणात कोणताही रस नाही. मला राज्यसभेबद्दलही विचारणा करण्यात आली होती; पण मी ती नाकारली आहे. मला कर्नाटकच्या राजकारणातच राहायचे आहे," असे स्‍पष्‍ट मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर सिद्धरामय्यांनी स्‍पष्‍ट केले. बेंगळुरू येथील लोकभवन येथे आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्‍यान, आज (दि. २८) मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा सादर करताना त्‍यांच्‍यासोबत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते.

१६२ आश्वासनांपैकी १५८ आश्वासनांची अंमलबजावणी

काँग्रेस पक्षाची आश्वासने पूर्ण करून आपण "दिलेला शब्द पाळला" असे सांगत मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर सिद्धरामय्या भावूक झाले. ते म्हणाले की, विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला तोंड देत सरकारने बहुतांश आश्वासनांची पूर्तता केली आहे. २०१८ मध्ये केलेल्या १६२ आश्वासनांपैकी १५८ आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने दिलेल्या ५५० आश्वासनांपैकी सुमारे ३०० आश्वासने आधीच पूर्ण केली आहेत. सरकारने पहिल्याच वर्षी आपल्या पाचही प्रमुख 'गॅरंटी' योजना लागू केल्या आणि त्यासाठी तब्बल १.४ लाख कोटी रुपये खर्च केले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आश्‍वासन पूर्ण केल्‍याचे माझ्‍यासह पक्षाला समाधान

"आम्ही आमची आश्वासने पूर्ण करण्यापासून कधीही मागे हटलो नाही. या गोष्टीचे मला आणि माझ्या पक्षाला पूर्ण समाधान आहे," असे सिद्धरामय्या म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचाही समाचार घेतला.

'कर्नाटक आता दरडोई उत्पन्नात अव्वल'

सिद्धरामय्या यांनी सरकारच्या आर्थिक कामगिरीचे जोरदार समर्थन केले. काँग्रेसच्या गॅरंटी योजनांमुळे राज्य दिवाळखोरीत निघेल असा दावा करणाऱ्या टीकाकारांना प्रत्युत्तर देताना ते म्‍हणाले, कर्नाटक आता देशात दरडोई उत्पन्नात पहिल्या स्थानावर आणि जीएसटी (GST) संकलनात दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच, २०२५–२६ या वर्षात राज्याचा सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (GSDP) विकास दर ८.१ टक्के राहिला, जो देशाच्या ७.६ टक्के या सरासरी दरापेक्षा जास्त आहे, यावरही त्यांनी भर दिला. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढवला आहे, हा आरोप फेटाळून लावत त्यांनी हे दावे "खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित" असल्याचा दावाही त्‍यांनी केला.

राज्यसभेची ऑफर नाकारली, राज्याच्या राजकारणातच कार्यरत राहणार

यावेळी सिद्धरामय्या यांनी हे स्पष्ट केले की, त्यांचा राजकीय प्रवास अजून संपलेला नाही. आपण राज्याच्या राजकारणातच सक्रिय राहणार असून, राष्ट्रीय राजकारणात जाण्यात आपल्याला कोणताही रस नसल्याचे त्यांनी जाहीर केले. ते म्‍हणाले, "मी सक्रिय राजकारणातच कार्यरत राहीन. मला राष्ट्रीय राजकारणात कोणताही रस नाही. मला राज्यसभेबद्दलही विचारणा करण्यात आली होती. पण मी ती नाकारली. मला कर्नाटकच्या राजकारणातच राहायचे आहे," असे ते म्हणाले.

हाय कमांडच्‍या आदेशानुसार राजीनामा दिला

सिद्धरामय्या यांनी हे स्पष्ट केले की, त्यांचा राजीनामा हा काँग्रेस नेतृत्वाच्या निर्देशानुसारच देण्यात आला आहे. मी तुम्हा सर्वांना अनेकदा सांगितले आहे की, जेव्हा 'हाय कमांड' मला राजीनामा देण्यास सांगेल, तेव्हा मी राजीनामा देईन," असे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी, 'हाय कमांड'ने मला पद सोडण्यास सांगितले. मी त्यांना सांगितले की, मी आज राजीनामा देईन. म्हणूनच, मी आता राजीनामा दिला आहे," असे त्यांनी स्‍पष्‍ट केले.

राजीनामा पत्र राज्‍यपालांच्‍या सचिवांकडे सुपूर्द

सिद्धरामय्या म्हणाले की, राजीनामा पत्र राज्यपालांच्या कार्यालयात सादर करण्यात आले आहे; कारण राज्यपाल सध्या बंगळुरुबाहेर आहेत. राज्यपाल सध्या इथे नाहीत. मला सांगण्यात आले आहे की, ते आज रात्री परत येत आहेत. राजीनामा पत्र त्यांच्या कार्यालयात आणि त्यांच्या सचिवांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. आपला राजीनामा स्वीकारणे आणि नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करणे, हे राज्यपालांवर घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे."

काँग्रेस सरकार संख्याबळाच्या दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित

"कायद्यानुसार, त्यांना माझा राजीनामा स्वीकारणे भागच आहे. एकदा का मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला की, राज्यपालांना तो स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांसाठी मार्ग मोकळा करावा लागतो. ही त्यांची जबाबदारी आहे," असे ते म्हणाले. राजकीय अस्थिरतेबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, सिद्धरामय्या यांनी ठामपणे सांगितले की, काँग्रेस सरकार संख्याबळाच्या दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित आहे. आमच्या पक्षाचे १३६ आमदार आहेत. दोन अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे," असे ते म्हणाले. नेतृत्वातील बदलाचा आघाडीच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसल्‍याचा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT