Shopian Encounter Latest Update:
श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील शोपियाँ येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमकीची सुरूवात कुलमाग येथे झाली. पण नंतर दहशतवाद्यांनी शोपियाँमधील जंगलात पळ काढला. आणखी एक दहशतवादी परिसरात लपून बसला असावा, अशी माहिती सुरक्षा दलांच्या हाती लागली असून परिसरात कसून शोधमोहीम राबवली जात आहे.
दक्षिण काश्मीरमधील शोपियाँमधील शुकरु केलर येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. यानुसार मंगळवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम राबवली. लपून बसलेले दहशतवादी हे लष्कर- ए- तोयबाशी संबंधित असल्याचे समजते. मात्र, सुरक्षा दलांनी या वृत्ताबाबत अद्याप दुजोरा दिलेला नाही.
शुकरु केलर हा घनदाट जंगल परिसर आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर आणखी एकाचा शोध सुरू असल्याचे वृत्त इंग्रजी माध्यमांनी दिले आहे.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांना गोळीबार केल्याने 26 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये पर्यटकांचाही समावेश असल्याने संतापाची लाट उसळली होती. भारतानेही या हल्ल्याला जशास तसे उत्तर देत 7 मे रोजी पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले.
पाकिस्तानच्या 40 जवानांचा मृत्यू
भारताने दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू करताच पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांच्या मदतीला धावले. पाकिस्तान सैन्याने भारतातील सीमेलगतच्या शहरांमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्य, हवाई आणि नौदल अशा तिन्ही फौजांनी अक्षरश: पाकिस्तानची कोंडी केली. पाकिस्तानच्या 40 सैनिकांचा भारताच्या प्रत्युत्तरात मृत्यू झाल्याचे सैन्याचे डीजीएमओ राजीव घई यांनी नुकतंच पत्रकार परिषदेत सांगितले.