"वंदे मातरम्" राष्ट्रगीत अधिकृत कार्यक्रमांमध्ये गायन आणि वाजवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एकूण ३ मिनिटे आणि १० सेकंद कालावधी असलेल्या या गाण्याच्या सहा कडव्यांना आता सरकारी कार्यक्रमांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
Shashi Tharoor on vande mataram compulsion
थिरुअनंतपूरम : "देशभक्ती ही हृदयातून येते. आम्हाला वंदे मातरम् गीताची कायद्याद्वारे सक्ती करू नका," अशी मागणी काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केली. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत अधिकृत कार्यक्रमांमध्ये गायन आणि वाजवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
'इंडियन एक्सप्रेस'मधील लेखात शशी थरुर यांनी लिहिलं आहे की, बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे गीत स्वातंत्र्य चळवळीतील एक उत्साही घोषणा होती. या गाण्यानेच सत्याग्रहींना लाठीचार्ज सहन करण्याचे धाडस दिले. हेच गीत गात क्रांतिकारक फाशीवरही गेले; पण आज भारत हा एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आहे. त्यामुळेच आपण राज्य प्रतीके आणि वैयक्तिक विवेक यांच्यात संतुलन राखले पाहिजे.
स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने "वंदे मातरम्" गायले होते; परंतु देशाची धार्मिक विविधता लक्षात घेता "जन गण मन" हे राष्ट्रगीत म्हणून निवडले गेले. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या भूमिकेचा सन्मान करण्यासाठी आणि कोणत्याही समुदायाला वेगळे करू नये म्हणून संविधान सभेने "वंदे मातरम्" ला "समान दर्जा" राष्ट्रीय गीत म्हणून दिला. ही जाणीवपूर्वक केलेली तडजोड होती, असेही थरुर यांनी नमूद केले आहे.
वंदे मातरम् गीतामधील सुरुवातीच्या ओळी प्रतीकात्मकपणे मातृभूमीच्या नैसर्गिक सौंदर्याचे वर्णन करतात, ज्याची प्रत्येकजण प्रशंसा करू शकतो. परंतु नंतरच्या श्लोकांमध्ये दुर्गा आणि लक्ष्मीसारख्या देवींचा उल्लेख आहे, ज्या काही धर्मांचे लोक धार्मिक कारणांमुळे गाऊ शकत नाहीत. थरूर म्हणाले की, अनेक मुस्लिम नागरिक याच मुद्द्यावर आक्षेप घेतात. इस्लाममध्ये एक देव मानला जातो. तो दुसऱ्या कोणासमोरही नतमस्तक होण्याची किंवा पूजा करण्याची परवानगी देत नाही. म्हणून आता जर सरकारने नंतरचे श्लोक अनिवार्य केले, तर काही नागरिकांना श्रद्धा आणि राज्य यांच्यातील निवड करावी लागेल. धर्मनिरपेक्ष लोकशाहीने अशी परिस्थिती टाळली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आपल्या लेखात थरुर यांनी १९८६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे. राष्ट्रगीत न गायल्याबद्दल तीन विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. राष्ट्रगीतासाठी विद्यार्थी आदराने उभे राहिले होते; पण धार्मिक कारणांसाठी त्यांनी गाणे गायले नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई रद्द करताना म्हटले होते की, राष्ट्रगीतावेळी एखादी व्यक्ती आदराने उभी राहिली तर पुरेसे आहे. गाणे गायले नाही हे कायद्याचे उल्लंघन किंवा देशभक्तीचा अभाव नाही. थरूर यांनी वंदे मातरम् वादातही हेच मॉडेल स्वीकारावे, असे सुचवले. ज्यांना नंतरचे श्लोक म्हणायचे आहेत, त्यांना ते म्हणण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.