

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पक्ष नेतृत्वाने दुर्लक्ष केल्यामुळे अस्वस्थ असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे तिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे तणाव निवळण्याचे संकेत मिळाले. त्यामुळे ते केरळच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
बैठकीनंतर थरूर अत्यंत उत्साही आणि आनंदी होते. पक्ष नेतृत्वाने त्यांच्या सर्व चिंता दूर केल्याचे सूत्रांनी सांगितले. एप्रिल-मे महिन्यात होणार्या केरळ विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष सज्ज होत असताना थरूर यांना सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थरूर यांना राहुल गांधी यांनी आश्वासन दिले की, त्यांना पुढे पक्षात योग्य सन्मान मिळेल.
खर्गे यांच्या संसद कार्यालयात झालेल्या सुमारे दोन तासांच्या बैठकीत थरूर यांच्याकडे पक्षाने केलेल्या दुर्लक्षाबद्दल आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या भविष्यातील रणनीतीमध्ये त्यांची भूमिका असणार की नाही, या बाबींवर चर्चा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थरूर यांनी राज्यातील पक्षाच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचे नेतृत्वाला आश्वासन दिले.
थरूर यांना केरळमध्ये मोठा सार्वजनिक जनाधार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांना सहभागी करून न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, याची जाणीव हायकमांडलाही आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.