पुढारी ऑनलाईन डेस्क : देशामध्ये तसेच महाराष्ट्रात घडलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या घटनांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भुमिका दाखवली आहे. दरम्यान बोलताना ते म्हणाले राज्यात झालेल्या जेव्हा आरोपी आमच्या माता, बहिणी आणि मुलींवर हात ठेवतात अशा लोकांचे माझ्या मते त्याचे गुप्तांग काढले पाहिजे, महिलांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना नपुंसक बनवायला हवे, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.24) व्यक्त केले. यवतनाळमध्ये 'लाडकी बहिन योजने'अंतर्गत एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार एकाही आरोपीला सोडणार नाही, असेही पवार म्हणाले. अशा प्रकरणांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करणारे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, जेव्हा आरोपी आमच्या माता, बहिणी आणि मुलींवर हात ठेवतात तेव्हा त्यांना दोनदा विचारही करता येणार नाही, अशी शिक्षा द्यायला हवी. माझ्या मते त्याचे गुप्तांग काढले पाहिजे. काही लोक इतके गलिच्छ आहेत की त्यांनी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे. बदलापूरमध्ये दोन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात राज्यात प्रचंड संताप आणि निदर्शने सुरू आहेत. महिला आणि मुलांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यावर चार वर्षांच्या दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या विरोधात मंगळवारी (दि.20) मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हजारो लोकांनी रस्ते आणि रेल्वे मार्ग रोखून धरले होते. यादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. महाराष्ट्रातील बदलापूर येथील शाळेतील मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाबाबत महाविकास आघाडी आघाडीच्या वतीने शनिवारी (दि.24) आंदोलन करण्यात आले. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांनी महायुती सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. एमव्हीएच्या नेत्यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती, ज्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. महायुती सरकारवर आरोप करताना ते म्हणाले की, बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींच्या कथित लैंगिक छळाच्या घटनेने देशात महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. महिलांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे हे शिंदे सरकार विसरले असल्याचा आरोप पवार यांनी केला.