Sadhvi Pragya on Congress
भोपाळ: मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर काही दिवसांनी, भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी या निकालाचे वर्णन 'सत्याचा विजय' असे केले आहे.
रविवारी मध्य प्रदेशातील राजा भोज विमानतळावर त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत, हे संपूर्ण प्रकरण काँग्रेसने रचलेले एक 'देशद्रोही षडयंत्र' होते, असे म्हटले आहे.
विमानतळावर माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, "धर्म आणि सत्य आमच्या बाजूने होते, त्यामुळे आमचा विजय निश्चित होता. 'सत्यमेव जयते!' हे मी पूर्वीही म्हणाले होते आणि आज ते सिद्ध झाले आहे. विधर्मी आणि देशद्रोह्यांची तोंडं काळी झाली आहेत.
त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. देश नेहमीच धर्म आणि सत्याच्या बाजूने उभा राहिला आहे आणि पुढेही राहील."
साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत म्हटले की, मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे राजकारण करणे ही काँग्रेसची जुनी सवय आहे. आपल्या सत्ताकाळात त्यांनी याच राजकारणाचा वापर केला. काँग्रेसच्या लोकांनी हिंदूंवर शक्य त्या सर्व मार्गांनी अत्याचार केले. त्यांना तुरुंगात डांबले आणि त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या.
त्यांनीच 'भगवा दहशतवाद' आणि 'हिंदुत्ववादी दहशतवाद' असे शब्दप्रयोग तयार केले. काँग्रेसची मानसिकता किती खालच्या पातळीची आहे, हे यातून दिसते. हे संपूर्ण प्रकरण काँग्रेसने रचलेले एक षडयंत्र होते आणि हा प्रकार देशद्रोहाच्या श्रेणीत येतो," असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
साध्वी प्रज्ञा यांनी आरोप केला की, जेव्हा महाराष्ट्र आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला आणि त्यांना भ्रष्ट बनवले. "हे सर्व तत्कालीन UPA सरकारने केले," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, "तत्कालीन एटीएसच्या (ATS) अधिकाऱ्यांनी देशात भीतीचे वातावरण निर्माण केले होते, ज्यामुळे कोणीही मोकळेपणाने बोलू शकत नव्हते. महाराष्ट्र आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे लोकांना घाबरवण्याचा हा एक प्रयत्न होता."
यावेळी त्यांनी एक धक्कादायक दावाही केला. "एटीएसने केलेल्या छळामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. पण त्यांचे मृतदेह कुठे आहेत, याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना आजही नाही. अनेकांना ठार मारण्यात आले, पण त्यांची नोंदही पुसून टाकण्यात आली," असे साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.
29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मुस्लिमबहुल शहर असलेल्या मालेगावमध्ये एका मशिदीजवळ मोटारसायकलला लावलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. या शक्तिशाली स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते.
या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना आरोपी करण्यात आले होते. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर नुकतेच मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली, ज्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेसवर हे गंभीर आरोप केले आहेत.