राष्ट्रीय

Modi-Putin Car ride : 10 मिनिटे थांबतो, पण मोदींबरोबरच गाडीतून जाणार..! पुतीन यांचा भारतीय पंतप्रधानांसोबत मैत्रीचा प्रवास

पीएम मोदी आणि पुतीन यांच्यातील जवळीक दाखवणारा हा फोटो आता जगभरातील चर्चेचा विषय बनला आहे

पुढारी वृत्तसेवा

त्येनजिन : चीनमध्ये सुरू असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या भेटीची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. या भेटीसोबतच मोदी आणि पुतीन यांच्या एकाच गाडीतून केलेल्या मैत्रीपूर्ण प्रवासाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मोदी-पुतीन यांनी एकाच गाडीतून केला प्रवास

मिळालेल्या माहितीनुसार, पुतीन यांनी पंतप्रधान मोदींसोबत त्यांच्या गाडीतून प्रवास करता यावा म्हणून तब्बल 10 मिनिटे वाट पाहिली. या घटनेवरून मोदी आणि पुतीन यांच्यात चांगली ट्यूनिंग जुळल्याचे दिसत आहे. त्यांच्यातील सहजता पाहून, येत्या काळात भारत आणि रशियामधील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चीनच्या त्येनजिन शहरात द्विपक्षीय बैठकीसाठी मोदी आणि पुतीन यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. पंतप्रधान मोदींनी स्वतः या प्रवासाचा फोटो त्यांच्या 'एक्स' हँडलवर शेअर केला. हा फोटो जगातील दोन महाशक्तींमधील वाढत असलेल्या परस्पर सामंजस्याचा पुरावा आहे.

शिखर परिषदेपूर्वी, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी हस्तांदोलन केले आणि एकमेकांना मिठी मारली. बैठकीनंतर, मोदींनी 'एक्स'वर एक फोटो पोस्ट करत म्हटले, ‘राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भेटून नेहमीच आनंद होतो.’

पीएम मोदी आणि पुतीन यांच्यातील जवळीक दाखवणारा हा फोटो आता जगभरातील चर्चेचा विषय बनला आहे. रशिया आणि भारत मिळून भविष्यात कोणते महत्त्वाचे निर्णय घेतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

SCO कडून पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध

चीनमध्ये सुरू असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत भारताला एक मोठा कूटनीतिक विजय मिळाला आहे. या परिषदेत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.

SCO गटाने त्येनजिन येथे आयोजित दोन दिवसीय वार्षिक शिखर परिषदेच्या शेवटी एक घोषणापत्र जारी केले. यामध्ये दहशतवादाशी लढण्याचा आपला दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्याचा निषेध

या घोषणेमध्ये, 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा सदस्य देशांनी तीव्र निषेध केला आहे. यासोबतच, गाझा येथे इस्रायलने केलेल्या लष्करी हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल आणि गाझामध्ये निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमुळे या हल्ल्यांचाही निषेध नोंदवण्यात आला. घोषणापत्रात प्रादेशिक सुरक्षा वाढवण्याच्या उपायांचा उल्लेख करण्यात आला असून, दहशतवादाला एक मोठे आव्हान मानले आहे. SCO सदस्य देशांनी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील खुजदार आणि जाफर एक्स्प्रेसवरील दहशतवादी हल्ल्यांचाही निषेध केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT