

बीजिंग; पीटीआय : चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीमध्ये पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवाद्यांवर बंदी घालण्यास अडथळा आणला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे दहशतवादविरोधी लढ्यात भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची आग्रही मागणी केली. सोबतच जिनपिंग यांनी मोदींची मागणी मान्य केल्याने पाकिस्तानला झटका बसला आहे.
मोदी आणि जिनपिंग यांच्यातील महत्त्वाच्या भेटीकडे जगाचे लक्ष लागून राहिले होते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 50 मिनिटे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यात अमेरिकेच्या टॅरिफला शह देण्यावरही चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर ब्रिक्स परिषदेसाठी जिनपिंग यांना मोदी यांनी भारतभेटीचे निमंत्रण दिले.
शांघाय परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचे शनिवारीच चीनमध्ये आगमन झाले. रविवारी जिनपिंग यांनी मोदी यांचे तियानजिन शहरात शाही स्वागत केले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये ट्रम्प टॅरिफच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासह दोन्ही देशांमध्ये पहिल्या टप्प्यात थेट विमान सेवा आणि मानसरोवर यात्रा सुरू करण्यास या बैठकीत सहमती झाली.
यावेळी मोदी म्हणाले की, द्विपक्षीय संबंधांच्या सातत्यपूर्ण विकासासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य असणे महत्त्वाचे आहे. द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर तसेच दहशतवाद आणि योग्य व्यापार यांसारख्या आव्हानांवर परस्परांना सहकार्य करण्यात येणार आहे. द्विपक्षीय संबंधांच्या राजकीय दृष्टिकोनातून आणि दोन्ही दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने यापुढे समन्वयाने काम करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. 2018 नंतर मोदींचा हा पहिलाच चीन दौरा आहे. दरम्यान, जिनपिंग यांनीही जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी ड्रॅगन आणि हत्ती यांनी एकत्रित येण्याची गरज अधोरेखित केली.
1) धोरणात्मक संवाद मजबूत करणे, परस्पर विश्वास वाढवणे.
2) देवाणघेवाण आणि सहकार्य वाढवणे.
3) परस्पर लाभ आणि दोघांसाठीही फायदेशीर परिणाम साधणे.
4) एकमेकांच्या समस्यांची दखल घेणे आणि समान हितांचे रक्षण