Reuters X account blocked account withheld
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था Reuters चे अधिकृत @Reuters X (पूर्वीचे ट्विटर) हँडल (अकाउंट) भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने यासंदर्भात कोणताही नवीन कायदेशीर आदेश दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रविवारी सकाळी रॉयटर्सचे X अकाउंट उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजर्सना एक संदेश दिसत होता- “Account withheld. @Reuters has been withheld in IN in response to a legal demand.”
म्हणजेच, एका कायदेशीर मागणीच्या प्रतिसादात भारतात हे अकाउंट ब्लॉक करण्यात आल्याचे X (ट्विटर) संकेतस्थळावर दर्शवले गेले.
X (पूर्वी ट्विटर) नुसार, एखादा अकाउंट "withheld" केला जातो जेव्हा सरकारकडून स्थानिक कायद्यानुसार किंवा कोर्टाच्या आदेशामुळे, X कडे त्या देशात काही पोस्ट किंवा संपूर्ण अकाउंट ब्लॉक करण्याची कायदेशीर मागणी केली जाते. X हे आदेश पाळण्यास बांधील असते, परंतु त्यामध्ये अचूकता आणि वेळेचे पालन आवश्यक असते.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, “रॉयटर्सचा अकाउंट ब्लॉक करण्याचा सरकारचा कुठलाही आदेश नाही. आम्ही X सोबत संपर्कात असून, ही अडचण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
दरम्यान, सरकारने म्हटले असले तरी, जागतिक पत्रकार संस्थेचा अकाउंट भारतात रोखला जाणे ही गंभीर बाब आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील पत्रकार स्वातंत्र्य आणि सोशल मीडिया नियमांविषयी चर्चा होऊ शकते.
जुना आदेश लागू करणे आणि तोही चुकीच्या वेळी – यामुळे X ची कार्यपद्धती आणि विश्वासार्हता यावरही प्रश्न उपस्थित होतो. सरकारने वेळीच स्पष्टता दिल्याने तणाव टळू शकतो, परंतु जर हा प्रकार पुन्हा झाला, तर सरकारवरच टीका होऊ शकते.
PTI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान ७ मे रोजी एक आदेश निघाला होता, परंतु तो कधीही लागू करण्यात आला नव्हता.
सध्या X ने बहुधा त्याच जुन्या आदेशाची अंमलबजावणी चुकून केली असावी, असे सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
त्यामुळे सरकारने X कडे तातडीने स्पष्टीकरण मागवले असून, रॉयटर्सचा अकाउंट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.
सध्या खालील रेॉयटर्सशी संबंधित हँडल्स भारतात उपलब्ध आहेत:
@ReutersTech (Reuters Tech News)
@ReutersFactCheck
@ReutersAsia
@ReutersChina
मात्र, मुख्य @Reuters आणि @ReutersWorld हे अधिकृत हँडल्स भारतात अद्याप बंद आहेत.
X च्या Help Center वर स्पष्ट केले आहे की- "Country withheld content" हा संदेश देशाच्या स्थानिक कायद्यांनुसार किंवा कोर्टाच्या आदेशानुसार कोणताही पोस्ट किंवा अकाउंट तात्पुरता रोखण्यात आला असल्याचे दर्शवतो.