Jitendra Mishra Ram Temple Trust CEO Pudhari
राष्ट्रीय

Ram Temple: रिटायर्ड एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिर ट्रस्टचे पहिले CEO; ‘ऑपरेशन सिंदूर’शी खास नातं, जाणून घ्या प्रोफाइल

Jitendra Mishra Ram Temple Trust CEO: अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे पहिले CEO म्हणून भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Rahul Shelke

Jitendra Mishra Ram Temple Trust CEO: अयोध्येतील राम मंदिराच्या व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी आता भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात त्यांनी भारतीय वायुसेनेच्या पश्चिम कमांडचे नेतृत्व केले होते.

कोण आहेत एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

एअर मार्शल जितेंद्र मिश्रा हे भारतीय वायुसेनेतील अनुभवी आणि माजी वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. त्याआधी त्यांनी इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफमध्ये (IDS) ऑपरेशन्स डेप्युटी चीफ तसेच डॉक्ट्रिन, ऑर्गनायझेशन आणि ट्रेनिंग विभागाचे डेप्युटी चीफ म्हणूनही काम केले आहे.

मिश्रा यांनी पुण्यातील खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) आणि डुंडीगल येथील एअर फोर्स अकादमीमधून प्रशिक्षण घेतले आहे. याशिवाय त्यांनी एअर फोर्स टेस्ट पायलट्स स्कूल, एअर कमांड अँड स्टाफ कॉलेज, मॉन्टगोमेरी (अलाबामा) आणि रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजमधूनही शिक्षण घेतले आहे.

38 वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव

जितेंद्र मिश्रा यांना 6 डिसेंबर 1986 रोजी एअर फोर्स अकादमीतून भारतीय वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये कमिशन मिळाले. आपल्या 38 वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी 3,000 तासांपेक्षा अधिक काळ विमान उड्डाण केलं आहे. त्यांनी फायटर, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर अशा 18 पेक्षा अधिक प्रकारच्या विमानांचे उड्डाण केले आहे.

कारगिल युद्धातही बजावली महत्त्वाची भूमिका

स्क्वाड्रन लीडर म्हणून जितेंद्र मिश्रा त्या टीमचा भाग होते, जिने कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या काळात मिराज-2000 विमानांवर लेझर-गाइडेड बॉम्ब ऑपरेशन करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले होते. त्यानंतर ‘ऑपरेशन सफेद सागर’दरम्यान टायगर हिल आणि मुंथो ढालो यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवरील हल्ल्यांमध्ये या बॉम्बचा वापर करण्यात आला.

‘ऑपरेशन सिंदूर’शीही संबंध

एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’. या कारवाईच्या काळात त्यांनी भारतीय वायुसेनेच्या पश्चिम कमांडची धुरा सांभाळली होती. त्यामुळे राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEOपदी त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या प्रशासकीय आणि नेतृत्व क्षमतेकडे विशेष लक्ष आहे.

राम मंदिराच्या वाढत्या धार्मिक, प्रशासकीय आणि व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या लक्षात घेता, मिश्रा यांचा दीर्घ लष्करी अनुभव आणि नेतृत्वाची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT