Rent a Garba Partner Pudhari
राष्ट्रीय

Rent a Garba Partner: नवरात्रीत गरबा खेळायला पार्टनर मिळत नाही? सोशल मीडियावरील भन्नाट ऑफर होतेय व्हायरल, काय आहे पॅकेज?

Rent a Garba Partner: नवरात्रीपूर्वी ‘Rent a Garba Partner’ नावाची सोशल मीडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Rahul Shelke

Rent a Garba Partner: नवरात्रीचा उत्साह आता शिगेला पोहोचू लागला आहे. गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, गरबा नाईट्सची तयारीही सुरू झाली आहे. मात्र, या सगळ्या उत्साहात ज्यांना गरबा खेळण्यासाठी पार्टनर मिळत नाही, त्यांच्यासाठी सोशल मीडियावर एक भन्नाट ‘ऑफर’ चर्चेचा विषय ठरत आहे.

इन्स्टाग्रामवर ‘Rent a Garba Partner’ नावाची एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कृष्ण मिस्त्री नावाच्या युजरने ही पोस्ट शेअर केली असून, त्यात गरबा पार्टनरसाठी सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे तीन पॅकेज देण्यात आले आहेत. या पॅकेजची किंमत 1,000 रुपयांपासून 2,000 रुपयांपर्यंत आहे.

सर्वात स्वस्त असलेल्या सिल्व्हर पॅकेजची किंमत 1,000 रुपये आहे. यामध्ये दोन तास गरबा खेळणे, समोरच्या व्यक्तीसोबत मॅचिंग आउटफिट्स घालणे आणि गरब्याच्या बेसिक स्टेप्स शिकवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. एवढेच नाही, तर ‘थोडे क्यूट सेल्फी’ काढण्याचाही उल्लेख या पॅकेजमध्ये करण्यात आला आहे.

यानंतर 1,500 रुपयांचे गोल्ड पॅकेज आहे. यामध्ये गरबा कार्यक्रमात तब्बल चार तास पार्टनरसोबत राहण्याची सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोघांची ओळख कशी झाली याची एक ‘क्यूट बॅकस्टोरी’ तयार करण्याचेही या पॅकेजमध्ये आहे. ग्राहकाच्या मित्रमैत्रिणींना गरजेनुसार ‘भाई’ आणि ‘भाभी’ म्हणून संबोधण्याची पर्यायी सुविधाही देण्यात आली आहे.

सर्वात महागडे प्लॅटिनम पॅकेज 2,000 रुपयांचे आहे. या पॅकेजमध्ये संपूर्ण दिवस वेळ घालवण्याची आणि त्यांचे खास गरबा डान्स मूव्ह्ज पाहण्याची ऑफर देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी ही खरंच सेवा आहे की केवळ मजेशीर प्रँक, असा सवाल केला. एका युजरने थेट विचारले की, “हे खरंच आहे का? कारण मला खरंच गरबा पार्टनर हवा आहे.”

दुसऱ्या युजरने 2,000 रुपयांचे पॅकेज 100 रुपयांच्या बजेटमध्ये मिळू शकते का, असा मजेशीर प्रश्न विचारला. तर आणखी एका युजरने अमेरिकेतही अशीच सेवा उपलब्ध आहे का, अशी विचारणा केली आहे.

दरम्यान, एका युजरने “मी खरंच अप्लाय करण्याचा विचार करतोय, मजा करू नका,” अशी प्रतिक्रिया दिली. पोस्टला आतापर्यंत 17 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून शेकडो कमेंट्समुळे ही पोस्ट चर्चेत आली आहे.

मात्र, ही सेवा प्रत्यक्षात उपलब्ध आहे की हा केवळ नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर केलेला सोशल मीडिया प्रँक किंवा विनोदी कंटेंट आहे, हे पोस्टवरून स्पष्ट होत नाही. त्यामुळे गरबा पार्टनर ‘भाड्याने’ घेण्यापूर्वी या ऑफरची सत्यता आणि अटी तपासणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT