Vinod Kumar Shukla Passes Away Pudhari
राष्ट्रीय

Vinod Kumar Shukla Passes Away: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विनोदकुमार शुक्ल यांचं निधन; वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vinod Kumar Shukla Passes Away: ज्येष्ठ कवी-कथाकार विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. साधी भाषा, खोल आशय आणि माणुसकीची भावना हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. ‘नौकर की कमीज’सारख्या कादंबऱ्यांमुळे ते वाचकांच्या मनात कायम राहतील.

Rahul Shelke

Vinod Kumar Shukla Passes Away: ज्येष्ठ कवी-कथाकार विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे. रायपूर येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. मार्च महिन्यातच त्यांना हिंदी साहित्यातील सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता.

1 जानेवारी 1937 रोजी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे जन्मलेले विनोद कुमार शुक्ल हे अत्यंत मृदू स्वभावाचे लेखक म्हणून ओळखले जात. साधेपणातून खोल अर्थ उलगडणारी त्यांची भाषा हेच त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य होतं.

कृषी विज्ञानाचं शिक्षण घेतलेल्या शुक्ल यांना माती, झाडं-वनस्पती आणि निसर्गाशी खास जिव्हाळा होता. हाच जिव्हाळा त्यांच्या कविता, कथा आणि कादंबऱ्यांमध्ये सातत्यानं दिसतो. समाज आणि माणूस अधिक माणुसकीनं जगावा, हीच त्यांच्या साहित्याची भूमिका होती.

कविता आणि कथेची सीमारेषा पुसणारा लेखक

‘लगभग जयहिंद’ या कविता-संग्रहापासून त्यांच्या साहित्यप्रवासाची सुरुवात झाली. पुढे ‘वह आदमी चला गया, नया गरम कोट पहिनकर विचार की तरह’, ‘सब कुछ होना बचा रहेगा’ आणि ‘आकाश धरती को खटखटाता है’ यांसारख्या काव्यसंग्रहांनी हिंदी कवितेला नवी दिशा दिली.

कथालेखनातही त्यांनी वेगळाच ठसा उमटवला. ‘नौकर की कमीज’ आणि ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबऱ्यांनी गद्याचं सौंदर्यच बदलून टाकलं. ‘पेड़ पर कमरा’ आणि ‘महाविद्यालय’सारख्या कथासंग्रहांतून त्यांनी वेगळच जग वाचकांसमोर उभ केलं.

विनोद कुमार शुक्ल यांच्या लेखनाला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. साहित्य अकादमी पुरस्कार, गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप, शिखर सन्मान, राष्ट्रीय मैथिलीशरण गुप्त सन्मान, रघुवीर सहाय स्मृती पुरस्कार आणि अलीकडील ज्ञानपीठ पुरस्कार, असे अनेक सन्मान त्यांच्या वाट्याला आले. त्यांचं साहित्य वाचताना कोणताही दिखावा जाणवत नाही. उलट, माणसाला त्याच्या मुळांकडे, साधेपणाकडे आणि माणुसकीकडे परत नेण्याची ताकद त्यांच्या साहित्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT