नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर समूहाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिसरी अटक केली आहे. अमर नाथ दत्ता नावाच्या व्यक्तीला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.
ही कारवाई 68 कोटी रुपयांच्या बनावट बँक गॅरंटी जारी करण्याच्या तपासाशी संबंधित आहे. दत्ताला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले असून, विशेष न्यायालयाने त्याला चार दिवसांच्या ‘ईडी’ कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
बनावट गॅरंटीचा गोरखधंदा
यापूर्वी, ‘ईडी’ने रिलायन्स पॉवरचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी अशोककुमार पाल आणि ओडिशा येथील बिसवाल ट्रेडलिंगचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ सारथी बिसवाल यांना याच प्रकरणात अटक केली होती.
‘ईडी’च्या म्हणण्यानुसार, बिसवाल ट्रेडलिंग विविध व्यावसायिक गटांना बनावट बँक गॅरंटी पुरवण्याचे रॅकेट चालवत होती. ही बनावट गॅरंटी रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेड (रिलायन्स पॉवरची उपकंपनी) ने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे सादर केली होती, जी नंतर बनावट असल्याचे आढळले.
अनिल अंबानी यांचा संबंध नाकारला
रिलायन्स समूहाने स्पष्ट केले आहे की, अनिल अंबानी हे गेल्या साडेतीन वर्षांपासून रिलायन्स पॉवरच्या संचालक मंडळावर नाहीत आणि या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. रिलायन्स पॉवरने यापूर्वीच हे स्पष्ट केले आहे की, ते या प्रकरणात ‘फसवणूक, बनावटगिरी आणि गुन्हेगारी कटाचे बळी’ आहेत आणि त्यांनी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.
1) तिसरी अटक : अमर नाथ दत्ताला बनावट बँक गॅरंटी प्रकरणात अटक.
2) प्रकरणाचा आधार : एसईसीआयला सादर केलेली 68.2 कोटींची बँक गॅरंटी बनावट आढळली.
3) पूर्वीचे आरोपी : माजी सीएफओ अशोक पाल आणि पार्थ सारथी बिसवाल (बिसवाल ट्रेडलिंग एमडी) अटकेत.
4) फसवणुकीची पद्धत : आरोपींनी बनावट ई-मेल डोमेनचा वापर करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने फसवेगिरीचा प्रयत्न केला.