RBI Repo Rate :
दसरा आणि दिवाळी हा सणासुदीचा काळ भारतात घर खरेदीसाठी नेहमीच शुभ मानला जातो. या काळात बांधकाम व्यावसायिक आणि बँका अनेक आकर्षक योजना घेऊन येतात. पण, यंदा घर खरेदीदारांचे लक्ष भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या मौद्रिक धोरण समितीच्या (MPC) बैठकीकडे लागले आहे, ज्याचे निर्णय १ ऑक्टोबर रोजी जाहीर होतील.
यावेळी MPC रेपो रेटमध्ये ०.२५% ची कपात करू शकते असा अंदाज मार्केटमधील जाणकार व्यक्त करत आहे की, जर ही कपात झाली, तर त्याचा थेट आणि मोठा फायदा सामान्य नागरिकांना मिळेल.
रेपो रेट कमी झाल्यास गृहकर्ज, कार कर्ज आणि पर्सनल लोनच्या EMI मध्ये घट होईल. घर खरेदीदारांसाठी हे एखाद्या 'दिवाळी गिफ्ट'पेक्षा कमी नसेल.
EMI कमी झाल्यामुळे घर घेणे अधिक परवडणारे होईल. डेव्हलपर्सच्या मते, सणासुदीची पारंपरिक मागणी आणि व्याजदरातील घट यांचा एकत्रित परिणाम 'डबल बूस्टर' प्रमाणे काम करेल. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
खरेदी क्षमता वाढेल : एम२के ग्रुपचे डॉ. विशेष रावत यांच्या म्हणण्यानुसार, रेपो रेट कपातीचा थेट परिणाम घर खरेदीदारांच्या क्रयशक्तीवर (Purchasing Power) होईल. मासिक हप्ते कमी झाल्याने त्यांचा मासिक आर्थिक ताण कमी होईल, म्हणजेच घर खरेदी करण्याची त्यांची क्षमता वाढेल.
आत्मविश्वास वाढेल :
नवरात्रीपासून दिवाळीपर्यंतचा काळ बुकिंगसाठी उत्तम असतो. EMI कमी झाल्यास खरेदीदारांचा आत्मविश्वास अधिक वाढेल, विशेषतः जे लोक आतापर्यंत घर खरेदीची वाट पाहत होते, त्यांना फायदा होईल.
मागणीत दुहेरी वाढ:
होम अँड सोलच्या साक्षी कटियाल यांनी या वेळी विक्रीत डबल डिजिट वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या मते, दिवाळीच्या वेळी EMI कमी होणार असल्याची बातमी लोकांपर्यंत पोहोचल्यास मागणी वाढेल.
पहिल्यांदा घर घेणाऱ्यांना दिलासा :
ऑरिस ग्रुपचे विशाल सभरवाल सांगतात की, "जे लोक पहिल्यांदा घर घेण्याचा विचार करतात, ते सर्वात आधी EMI किती येईल हे पाहतात. थोडीशीही कपात त्यांच्यासाठी मोठा फरक निर्माण करते आणि सणासुदीत त्यांचा खरेदीबाबतचा मूड सकारात्मक होतो."
एकंदरीत, सणासुदीच्या तोंडावर संभाव्य रेपो रेट कपातीची बातमी रिअल इस्टेट क्षेत्रात आशा निर्माण करत आहे. यामुळे हा सिझन घर खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांसाठीही एक उत्कृष्ट संधी बनू शकतो.