राष्ट्रीय

Ram Mandir Trust Deputy CEO : अयोध्या राम मंदिर ट्रस्टमध्ये लवकरच 'डिप्टी सीईओ'चीही होणार नियुक्ती

नवीन सरचिटणीस गोविंददेव गिरींची घोषणा, प्रशासकीय कामांना गती मिळण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Ram Mandir Trust Deputy CEO : अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी एअर मार्शल (निवृत्त) जितेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीनंतर आता लवकरच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (डिप्टी सीईओ) देखील तैनात केले जाणार आहेत. राम मंदिर ट्रस्टचे नवनियुक्त सरचिटणीस महंत गोविंददेव गिरी यांनी ही माहिती दिली. शोध समितीने अत्यंत पारदर्शक प्रक्रियेद्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा केला असून उपलब्ध पॅनेलमधून आवश्यकतेनुसार या पदावर नियुक्ती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अधिकृत प्रवक्त्यासाठीची नियुक्‍ती सध्‍या स्‍थगित

दरम्यान, ट्रस्टच्या अधिकृत प्रवक्त्यासाठी योग्य व्यक्तीचा शोध अद्याप सुरू असल्याने ही नियुक्ती सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. योग्य नाव निश्चित होताच याची घोषणा केली जाईल. महंत गोविंददेव गिरी यांनी तीन नवीन विश्वस्तांचे स्वागत करत शोध समितीचे सदस्य न्यायमूर्ती प्रमोद कोहली, लेफ्टनंट जनरल विष्णूकांत चतुर्वेदी आणि उद्योजक डॉ. सुरेश हावडे यांचे आभार मानले. नवनिर्वाचित विश्वस्त डॉ. निर्मला यादव यांच्या प्रवेशाने ट्रस्टला परिपूर्णता आल्याचे त्यांनी सांगितले. "आपल्याला भव्य मंदिर सेवेसाठी मिळाले आहे. अयोध्या शहराला जगाची सांस्कृतिक राजधानी बनवणे, भाविकांच्या सुविधा वाढवणे आणि मंदिराची सेवा पद्धत आदर्श बनवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सीईओ जितेंद्र मिश्रा अयोध्यात दाखल

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र मिश्रा यांनी गुरुवारी अयोध्यात आगमन केले. विमानतळावरून थेट तीर्थ क्षेत्र भवनात पोहोचल्यानंतर त्यांनी रामललाचे दर्शन घेतले. त्यानंतर रामघाट येथील कार्यशाळेत जाऊन सरचिटणीस गोविंददेव गिरी व अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

प्रशासकीय कामांना गती मिळण्याची शक्यता

सीईओ पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जितेंद्र मिश्रा यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. तत्पूर्वी, नवनियुक्त सरचिटणीस गोविंददेव गिरी यांनी कारसेवकपुरम येथे जाऊन माजी सरचिटणीस चंपत राय यांची सदिच्छा भेट घेतली. नव्या प्रशासकीय रचनेमुळे राम मंदिराची वाढती व्यवस्था, भाविकांच्या सुविधा आणि इतर प्रशासकीय कामांना आता अधिक शिस्त व गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT