Ram Mandir Flag Row:
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वजारोहण केलं. यानंतर पोटशूळ उठलेल्या पाकिस्ताननं मानवाधिकार आणि अल्पसंख्यांकांचा मुद्दा उपस्थित करत गळा काढला. त्याला आज (दि. २७ नोव्हेंबर) भारतानं देखील चोख अन् त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पाकिस्तानला दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण झाल्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिखरावर धर्म ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर पाकिस्ताननं यावर आक्षेप घेत, हा मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांकांची संस्कृती नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचा खोटा दावा केला. इतरांना हिंदू बहुसंख्यक असल्याचे दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचं देखील पाकिस्तान आपल्या अधिकृत वक्तव्यात दावा करत होते.
याला आता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी, 'आम्ही पाकिस्तानचं हे वक्तव्य पाहिलं आहे आणि हे वक्तव्य आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत नाकारात आहोत. ते पुढे म्हणाले, 'ज्या देशाचे दडपशाही, कट्टरतावाद त्यांच्या देशातील अल्पसंख्यांकांप्रती पद्धतशीरपणे वाईट वागणूक देणे याचे जुने रेकॉर्ड आहे त्या पाकिस्तानला दुसऱ्यांना लेक्चर देण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
पाकिस्ताननं भारतातील मुस्लिमांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केलं होतं. त्यानं याबाबत संयुक्त राष्ट्रांनी देखील हस्तक्षेप केला पाहिजे अशी मागणी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण केल्यानंतर बोलताना ५०० वर्षापासूनचा संकल्प पूर्ण झाला आहे. शतकांच्या जखमा आणि वेदना आता भरून निघत आहेत. अयोध्येतील राम मंदिर आता पूर्ण झालं आहे.