

Ayodhya ram mandir dhwajarohan 25 November:
प्रभू श्रीरामाच्या भव्य राम मंदिरात आज अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक 'धर्मध्वजारोहण' सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडतोय. या सोहळ्यासाठी देशभरातील सुमारे ८,००० विशेष व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहन भागवत यांचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती आहे.
तारखेचं विशेष महत्त्व
काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांनी ध्वजारोहणाच्या या शुभ मुहूर्ताचे महत्त्व स्पष्ट केले. आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिथी आहे. या तिथीला प्रभू रामचंद्रांचा आणि सीता मातेचा विवाह संपन्न झाला होता, तसेच प्रभू रामचंद्रांचा आणि हनुमानाचा जन्मही मंगळवारी झाला होता, असा उल्लेख आहे. या विशेष योगांमुळे आजचा अभिजीत नावाचा प्रधान मुहूर्त ध्वजारोहणासाठी निवडण्यात आला.
ध्वजावरील प्रतीके: हा सुवर्ण ध्वज पीतवस्त्रामध्ये असून, त्यावर खालील प्रतीके आहेत:
कोविदार (कांचनार) वृक्ष: हे अयोध्येच्या रघुवंशाचे राजचिन्ह आहे आणि वनस्पतींचे प्रतिनिधित्व करते.
सूर्य: प्रभू रामचंद्रांचे कुल सूर्यवंशी असल्याने सूर्याचे प्रतीक ध्वजावर आहे.
ॐ (ओंकार): हे हिंदू धर्माचे सर्वोच्च प्रतीक असून, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर या तीन देवतांचे प्रतिनिधित्व करते.
रक्षण: हा ध्वज हनुमंतरायांच्या स्वाधीन केला जातो, कारण अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्यक्ष हनुमंतरायांवर आहे.
राम मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये
मुख्य गाभारा: प्रभू श्रीरामाची बालरूपातील मूर्ती.
शैली: पारंपरिक नागर शैलीमध्ये मंदिराचे बांधकाम.
आकारमान:
लांबी: ३८० फूट
रुंदी: २५० फूट
उंची: १६१ फूट
रचना: हे तीन मजली मंदिर असून, प्रत्येक मजल्याची उंची २० फूट आहे.
इतर: मंदिरामध्ये ३९२ खांब आणि ४४ दरवाजे आहेत.
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हा संपूर्ण सोहळा पार पडला. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन खालीलप्रमाणे होते:
सकाळ १०:०० वा.: पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल झाले.
सकाळ १०:०० वा. नंतर: सप्त मंदिर (महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, अगस्त्य, वाल्मिकी, अहिल्या) यांना भेट आणि निषाद राज गुहा, माता शबरी, शेषवतार, आणि माता अन्नपूर्णा मंदिरामध्ये पूजा. राम दरबाराच्या गर्भगृहात प्रार्थना.
दुपारी १२:०० वा.: श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगव्या ध्वजाचे (धर्मध्वजाचे) ध्वजारोहण केले गेले.
आजच्या सोहळ्यामुळे अयोध्या परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच, सामान्य भाविकांसाठी प्रभू श्रीरामांचे दर्शन आजपासून बंद करण्यात आले आहे.
अयोध्येतील या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील काळाराम मंदिरामध्येही अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. मंदिरात सकाळी काकड आरती, माध्यान्न पूजन आणि ध्वज पूजनाच्या वेळेत प्रभू रामचंद्रांची महाारती आयोजित करण्यात आली. संध्याकाळी शयन आरती देखील भव्य स्वरूपात होणार असून भाविकांना प्रसादाचे वाटप केले जात आहे.